पनवेल : पनवेलकरांची भविष्यातील व सध्याची पाण्याची तहान ध्यानात घेऊन पालिका प्रशासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) अतिरिक्त पाणी मिळावे यासाठी साकडे घातले आहे. सुमारे ४० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पनवेल पालिका क्षेत्राला मिळेल अशी मागणी पालिका आयुक्तांनी एमआयडीसीकडे लेखी स्वरुपात केली आहे. या लेखी पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून पालिकेने बारवी धरणातून पाणी देण्याची विनंती केली आहे. या पाण्यासाठी पालिकेने सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी विविध योजनेतून देण्याचे नियोजन केले आहे.
आयुक्तांच्या या सर्व पाठपुराव्याला यश आल्यास पनवेलकरांना पुढील दोन वर्षांत अमृत योजनेतून रसायनी येथील पाताळगंगा नदी व्यतिरिक्त अजून एक जलस्रोत हाती लागणार आहे. तसेच पनवेलची भविष्यातील पाणी समस्या दूर होण्यासही मदत मिळणार आहे. पनवेल पालिका क्षेत्रात सुमारे ४० एमएलडी पाण्याची कमतरता आहे. यामुळे सिडको महामंडळाकडून पनवेल पालिकेने पाणीपुरवठा सेवा अद्याप हस्तांतरण केलेली नाही. १६० वर्षांची परंपरा असलेल्या पनवेल पालिकेने हक्काचे धरण तोकडे पडू लागल्यानंतर स्वताचे दूसरे धरण निर्माण करू शकली नाही.
सिडको मंडळाने धरण उभारू असा विश्वास दाखविला असला तरी प्रत्यक्षात सिडको मंडळानेसुद्धा अशी सोय अद्याप उभारलेली नाही. पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी अमृत योजनेतून पाताळगंगा नदीतील पाणी आरक्षित करुन तेथून पनवेल पालिका क्षेत्रात जलवाहिनीने आणण्यासाठी सुमारे १७० कोटी रुपये आतापर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जमा केले आहेत. यातून पनवेल पालिका क्षेत्रात ११० एमएलडी पाणी मिळणार आहे.
या जलवाहिनीचे काम सुरू असताना पालिका आयुक्त देशमुख यांनी अजून ४० एमएलडी पाण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडे प्रयत्न सुरू केले आहेत. पालिका स्थापन झाल्यानंतर पनवेलकरांची तहान भागविण्यासाठी हा सर्वात मोठा व सकारात्मक प्रयत्न प्रशासकीय स्तरावरून झाला आहे. पालिकेच्या मागणीनंतर बारवी धरणातून पाणी देण्यासाठी एमआयडीसी प्रशासन तयार आहे. मात्र यासाठी पालिकेला सुमारे १०० कोटी रुपये भरावे लागतील, असे पत्र एमआयडीसी प्रशासनाकडून उत्तर आल्यावर पालिका प्रशासनाने ही रक्कम कोणत्या योजनेतून भरू शकतो यावर बैठका सुरू केल्या आहेत.
तूर्तास १५ एमएलडी पाण्याची मंजुरी
एमआयडीसीने २ मे रोजी पनवेल पालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या पत्रात पालिका क्षेत्रातील २९ गावांपैकी नागझरी, चाळ, घोट, तळोजा मजकूर, कोयनावेळे, देवीचापाडा, पालेखुर्द व पडघे या ८ गावांना एमआयडीसी प्रशासन पाणीपुरवठा करत आहे. तसेच २९ गावांमधील पाणीपुरवठा सविस्तर अहवाल मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला आहे. या प्रकल्पाची मंजूरी शासनस्तरावर विचाराधीन आहे. तुर्तास पालिकेला लागणारे १५ एमएलडी पाणी आरक्षणास मंजूरी द्यावी असे शासनाने कळविले आहे. तळोजे औद्योगिक वसाहतीसाठी बारवी गुरुत्व वाहिणीव्दारे ९०० मीलीमीटर व्यासाची फीडर जलवाहिनीवरुन पाणीपुरवठा केला जातो. तरी पालिकेने मंजूर कोटय़ाव्यतिरिक्त उल्हास नदीतून अतिरीक्त ४० एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी पाटबंधारे विभागाकडून प्राप्त करुन घ्यावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mld water panvelkar municipal commissioner to midc amy
First published on: 24-05-2022 at 01:26 IST