शहरी संस्कृतीप्रमाणे हॉटेलमध्ये गायक गायिका हॉटेल ग्राहकांचे मनोरंजन व्हावे म्हणून गाणी म्हणतात. अशी हॉटेल्स नवी मुंबईतही आहेत. अशाच एका हॉटेलमध्ये मराठी गाण्यांची फर्माईश पूर्ण करणार नाही म्हणणाऱ्या हॉटेल व्यवस्थापकाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा- सासूशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीची जावायाकडून हत्या; पोलिसांकडून दोघांना अटक

नवी मुंबईतील तुर्भे भागात द टेस्ट ऑफ पंजाब नावाचे हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी गायक गायिका आहेत. स्वतः होऊन गाणी म्हणत असताना ग्राहकांनी एखादे गाणे म्हणण्याची इच्छा व्यक्त केली तर अशीही गाणी आवर्जून म्हटली जातात. बुधवारी रात्रीही नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये वातावरण होते. मात्र काही ग्राहकांनी मराठी गाण्यांची फर्माईश केली. मात्र व्यवस्थापकाने सुरवातीला मराठी गाणी येथे चालत नाहीत, असे सांगितले तर  त्यावर ग्राहकांनी मराठीला नकार दिल्याने वाद झाले. हे वाद विकोपाला जाऊ शकतात असे लक्षात आल्याने व्यवस्थापनाने मवाळ भूमिका घेत मराठी गाण्यांची फर्माईश रात्री ११ वाजल्यानंतरच पूर्ण करण्यात येईल, अशी सारवासराव केली. याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेत ग्राहकांच्या केवळ मराठी गाण्यांना बंदी का असा जाब विचारला मात्र उडवाउडवीची उत्तरे दिल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांना दोन चार थोबाडीत मारल्या त्यानंतर तात्काळ मराठी गाण्यांची फर्माईश पूर्ण करण्यात आली, अशी माहिती उपस्थित काही ग्राहक आणि मनसे कार्यकर्त्यांनी दिली. याबाबत  हॉटेल व्यवस्थापनपैकी कोणीही प्रतिक्रिया देण्यास पुढे आले नाही.

हेही वाचा- उरण: ३७ कोटींचे डिझेल परतावे थकल्याने मच्छिमार आर्थिक संकटात

अन्य भाषेच्या गाण्यांना आम्ही कधीही विरोध केला नाही. मात्र, महाराष्ट्रात हॉटेल असून मराठी गाण्यांना नकार देणऱ्यांना खळखट्याकचीच  भाषा समजते तो आमचा नाईलाज आहे. याबाबत सर्व हॉटेल चालकांना लवकरच मराठी गाण्यांना विरोध न करण्याचे निवेदन देणार आहोत, अशी माहिती नवी मुंबईतील मनसेचे अध्यक्ष गजानन काळे यांनी दिली.