Sharmila Thackeray on Yashashree Shinde : उरण मध्ये २२ वर्षीय तरुणी यशश्री शिंदेची निर्घृण हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. तसेच आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली. मनसे नेते राज ठाकरे यांच्या पत्नी आणि मनसे पक्षाच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनीही आज शिंदे कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच उरण पोलिसांशी चर्चा करून नवी मुंबई आणि उरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांची तीन प्रकरणे घडली आहेत. त्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांना कोणतीही दयामाया दाखवू नका, तसेच त्यांचा धर्म न बघता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी केली.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “आम्ही पोलिसांवर प्रचंड नाराज आहोत. यशश्री शिंदेंच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी येत असताना माझ्या समोर अशीच एक तिसरी घटना समोर आली. मुलीने नकार दिला म्हणून तिला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. अशा प्रकरणात पोलिसांना कुठलाही राजकीय पक्ष अडवणार नाही. ज्याप्रकारे पोर्श कार अपघात प्रकरणात कुणीतरी आमदार गेले होता, तसे इथे कुणीही येणार नाही. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे, पोलिसांनी आपली दहशत दाखवून दिली पाहीजे.”
हे वाचा >> यशश्री शिंदेची हत्या दाऊद शेखने कशी केली? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
तोपर्यंत पुरुष थांबणार नाहीत
“हिंस्रपद्धतीने मुलींवर अत्याचार होत आहेत. निर्भया प्रकरणात आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला सोडण्यात आले, हे चुकच आहे. ज्या मुलामध्ये इतकी विकृती आहे, त्याला आयुष्यभर तुरुंगात ठेवावे किंवा थेट फाशीच द्यावी. मंदिरातील पुजारीही जर महिलांवर अत्याचार करत असतील, मुलींना फसवून त्यांच्याशी लग्न करत असतील तर त्यांच्यावर पोलिसांची दहशत असली पाहीजे. पोलिसांची दहशत बसत नाही, तोपर्यंत पुरुष थांबणार नाही”, असेही त्या म्हणाल्या.
शक्ती कायदा मंजूर करा
दहा वर्षांपासून शक्ती कायदा मंजूर झालेला नाही. आमची पंतप्रधानांना विनंती आहे की, तुम्ही एका वर्षात शक्ती कायदा मंजूर करा. त्याची अंमलबजावणी होते की नाही? याचीही तपासणी करा. अशा गुन्ह्यातील गुन्हेगारांना वरच्या न्यायालयात जाण्याची मुभा न देता तात्काळ शिक्षा करा, असे त्या म्हणाल्या.
आणखी वाचा >> एकतर्फी नाही, लव्ह ट्रँगलमधून यशश्री शिंदेची हत्या? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती!
पुरुषाला धर्म नसतो
यशश्री शिंदे प्रकरणात लव्ह जिहादचा आरोप केला जात आहे. शर्मिला ठाकरे यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अशा घटनांमध्ये धर्म आमता कामा नये. शिळफाटा येथील घटनेत मंदिरातील पुजाऱ्यांनी महिलेवर बलात्कार केला. असे गुन्हे करणाऱ्या पुरुषांना धर्म नसतो. लव्ह जिहाद करणाऱ्या पुरुषाला मारायचं आणि मंदिरातील पुजाऱ्यांनी केलं म्हणून सोडायचं, असे नाही. दोन्ही घटनेतील आरोपी पुरुषांना कडक शासन झालं पाहीजे.
पुजाऱ्यांनी अत्याचार केलेले प्रकरण काय आहे?
घरगुती वादविवादाच्या मानसिक तणावात असलेली पीडित महिला ६ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास शिळफाटा येथील घोळ गणपती परिसरात आली होती. संपूर्ण रात्र ती या परिसरात होती. या महिलेला मंदिरातील पुजारी श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (६२), संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (४५) आणि राजकुमार रामफेर पांडे (५४) यांनी पाहिले. तिचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने तिघांनी तिच्या चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून तिला चहा पिण्यास दिला.
चहा पिताच तिला भांगेची नशा चढली. तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेवून या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. महिलेला शुद्ध आल्यानंतर तिने आरडाओरडा करत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतू, या तीन आरोपींनी त्या महिलेस मारहाण करत तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची हत्या केली.
© IE Online Media Services (P) Ltd