उरण : मोरा ते मुंबई (भाऊचा धक्का) या प्रवासी मार्गावरील जेट्टीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी खड्डे, तुटलेल्या लाद्या, कठडे, अंधाराचा सामना करत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. या समस्यांकडे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील स्थानिकांकडून होत आहे.

ब्रिटिश काळापासून मोरा ते मुंबई ही जलसेवा सुरू आहे. त्यासाठी बांधण्यात आलेली जेट्टीची दुरवस्था झाली आहे. येथे जाण्याच्या मार्गावरील लाद्या, पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. त्यामुळे हा रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला असून येथे सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले कठडेही ठिकठिकाणी तुटले आहेत. याच कठड्यावर दोन्ही बाजूला मोठंमोठी मासेमारी जाळी ठेवण्यात आली आहेत. या जाळ्यात अडकून अनेक प्रवासी पडल्याच्याही घटना घडत आहेत. या जाळ्यांमुळे येण्याजाण्याचा मार्ग निमुळता झाला आहे. या जाळ्यात प्रवाशांचा पाय अडकून अपघात होत आहेत. यात भर म्हणजे जेट्टीवर ये-जा करण्यासाठी असलेल्या मार्गावरील पथदिवे बंद आहेत. परिणामी प्रवाशांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागते. मोरा जेट्टीच्या मजबुतीकरणासंदर्भात माहिती घेण्यासाठी मोरा बंदर अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

दुरुस्तीच्या कामाला विलंब

  • येत्या काही दिवसांत या मार्गावरील तिकीट दरातही वाढ होणार आहे. एकीकडे तिकीट दरात वाढ होत असताना प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा मात्र अपुऱ्या आहेत.
  • ज्या ठिकाणी प्रवासी जहाजे लागतात ती ब्रिटिशकालीन जेट्टी ढासळण्याच्या स्थितीत असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे. अशा जेट्टीमुळे धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागत आहे.
  • या जेट्टीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून यासाठी अद्याप कोणतीही निविदा काढण्यात आलेली नाही. यामुळे जेट्टीच्या दुरुस्तीच्या कामाला विलंब लागणार आहे.

मोरा मुंबई जलप्रवास करीत असताना रात्री-अपरात्री यावे लागते. त्या वेळी जेट्टीवरून चालणे धोकादायक आहे. त्यामुळे या जेट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करावे आणि प्रवाशांना दिलासा द्यावा.- समीर पाटील, प्रवासी