उरण : मोरा बंदर ते मुंबईच्या भाऊचा धक्का दरम्यानच्या ७५ कोटी खर्चाचे मोरा रो-रो सेवेचे अनेक वर्षे रखडलेले काम आता एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याची माहीती महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र एप्रिल २०२६ चा मुहूर्तही आता टळला आहे.
गेले अनेक महिने रखडलेले हे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले होते. हे काम एप्रिल २०२६ ला पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता राजू झपाटे यांनी दिली होती. मात्र सध्या या जेट्टीवर केवळ एक सांगाडा तयार करण्यात आला आहे. ७५ कोटी खर्चाचे रो-रो सेवेचे काम अनेक अडथळ्यांमुळे २०१८ पासून कासव गतीने सुरू आहे. मात्र मागील चार-पाच महिन्यांपासून कामाला वेग आला होता. सातत्याने होणाऱ्या या जलमार्गाच्या कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. यातील रेवस जेट्टीच्या कामात पाच कोटींच्या खर्चात वाढ झाली आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून या जेट्टीचे काम करण्यात येत आहे. या जेट्टीचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे.
मोरा जेट्टीचे काम नऊ वर्षांपासून रखडले आहे. हे काम रखल्याने ५० कोटींच्या कामाची रक्कम ७५ कोटींवर पोहचली आहे. तरीही जेट्टीचे काम अपूर्णच असून जेट्टी पर्यंत जाण्यासाठी मार्ग ही होऊ शकलेला नाही. हे काम वारंवार बंद होऊन रखडले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होणार का असा सवाल आता या मार्गावरील प्रवासी करू लागले आहेत.
मोरा मुंबई रोरो जेट्टीचे काम ३८ टक्के पूर्ण झाले असून काम प्रगतीपथावर आहे. येत्या डिसेंबर २०२६ पर्यँय या जेट्टीचे काम पूर्ण करून ही सेवा नव वर्षात सुरू करण्याचा मानस आहे.- अजय यादव, उपअभियंता, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड
