नवी मुंबई : जलसंपन्न शहर म्हणून किर्ती असलेल्या नवी मुंबई महापालिकेत मोरबे धरणात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पालिकेला ऐन उन्हाळ्यात विभागवार पाणीकपात करावी लागली होती. परंतु मागील काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे आठवड्यापूर्वीच शहरातील पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. तर मोरबे धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने मोरबे धरण ९० टक्क्याहून अधिक भरले आहे. गेल्यावर्षी धरण भरण्यासाठी सप्टेंबर उजाडला होता.परंतु यावर्षी पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाला तर सुमारे ७०० मिमी पाऊस पडल्यास धरण याच महिन्यात भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाणीपातळी मार्च एप्रिलमध्येच झपाट्याने खाली गेली होती. तसेच दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने पाणीचिंताही वाढली होती. यंदाच्या पावसाळ्यात ९ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. परंतु पावसाळा सुरू होऊनही १५ जूनपर्यंत मोरबे धरण परिसरात फक्त ७८. ६० मिमी एवढ्याच पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे मोरबे धरणात केवळ २६ इतकाच पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करताना संध्याकाळच्या पाणी पुरवठयात पालिकेने वाढीव कपात केली होती.

हेही वाचा…उरण : गॅस शवदाहिनीची प्रतीक्षाच, नगर परिषदेचा ऑगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचा दावा

परंतु जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यातही सलग व चांगला पाऊस पडत असल्याने सोमवार ५ ऑगस्टपर्यंत मोरबे धरण क्षेत्रामध्ये एकूण २८५३ मिमी इतका पाऊस झालेला आहे. एकीकडे पाणीकपात रद्द झाली असून पुढील काही दिवस असाच चांगला पाऊस पडला तर ७०० मिमी पाऊस पडल्यास मोरबे धरण यंदा महिनाभरापूर्वीच भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्यावर्षी २४ सप्टेंबरला मोरबे धरण शंभर टक्के भरले होते. परंतु गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा धरणात अधिक पाऊस झाला असला तरी गेल्यावर्षी धरणात अधिक जलसाठा होता. यावर्षी कडक उन्हाळा व पाण्याची आवश्यकता यामुळे धरणाची पातळी अधिक खाली गेली होती. त्यामुळे यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत आजमितीला अधिक पाऊस होऊनही धरणात जलसाठा कमी आहे. परंतू पुढील काही दिवस असाच सलग पाऊस राहिल्यास धरण लवकरच १०० टक्के भरेल अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

नवी मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मागील काही दिवसापासून चांगला पाऊस झाल्याने धरणात चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. असाच सलग पाऊस पडत राहिल्यास व जवळजवळ ७०० मिमी अजून पाऊस पडल्यास यंदा धरण लवकर भरेल. सध्या मोरबे धरण ९० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. – अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता

हेही वाचा…भाजपच्या बेलापुरात नाईकांचा ‘सांगली पॅटर्न’?

मागील ३ वर्षांतील ५ ऑगस्टपर्यंतची स्थिती

२०२२-२३ २०२३-२४ २०२४-२५

५ ऑगस्टचा पाऊस ५ मिमी. १०.२० मिमी. ५१.८० मिमी.

एकूण पाऊस २११७ मिमी. २७५२ मिमी. २८५३ मिमी.

धरण पातळी ८१.९९ मीटर ८६.२९ मी. ८६.१८ मी.

धरणातील जलसाठा १३६ द.घ.मी. १७४. ५३३३ द.घ.मी. १७३.४८१ द.घ.मी.

धरणातील पाणी टक्केवारी ७१.२५ ९१.४३ ९०.८८ टक्के