लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : नवी मुंबई शहराला जलसमृद्धता बहाल करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता १९०.८९० द.ल.घ.मी. इतकी असून, विसर्ग पाणी पातळी तलांक ८८ मी. इतकी आहे. मोरबे धरण परिसरातही जोरदार पाऊस पडत धरण केव्हाही भरण्याची शक्यता असल्याचे त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने धरणातून केव्हाही विसर्ग होण्याची शक्यता असून त्याबाबत खालापूर तहसीलदारांना पत्र दिले असून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असून २५ ऑगस्ट २०२४ रोजी, दुपारी १ वाजेपर्यंत मोरबे धरणात १८५.१५१ द.ल.घ.मी. इतका पाणी साठा झालेला आहे, तसेच पाणी पातळी तलांक ८७.४० मी. इतकी झालेली आहे. सततच्या सुरु असलेल्या पावसामुळे व सतत असाच पाऊस सुरु राहील्यास पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु राहून धरणाची पाणी पातळी ८७.८५ मी. इतकी झाल्यास, धरणाचे दोन्ही वक्राकार दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येऊन, जादाचे पाणी मूळ धावरी नदी पात्रात सोडण्यात येईल असे खालापूर तहसीलदार व स्थानिक पोलीस प्रशासन यांस नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. तसेच त्यानंतरही, धरणाची पाणी पातळी ८८ मी. तलांक इतकी राखण्यासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग करणेत येईल असेही सूचित करण्यात आले आहे.
आणखी वाचा-उरण-पनवेल मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताने नागरिकांना दिलासा
धावरी नदीच्या तीरावरील विशेषत: चौक, जांभिवली, आसरे, धारणी, तुपगाव, आसरोटी, कोपरी या नदीकाठावरील व पाताळगंगा नदीवरील इतर गावांतील संबंधित सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना व गावातील नागरिकांना धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु केल्यानंतर, नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल, याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून सतर्कतेबाबत अनुषंगिक सुचना देण्याचे कळविण्यात आलेले आहे. तसेच या दरम्यान कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिकांनी व पर्यटकांनी प्रवेश न करण्याबाबत आणि नदीच्या पात्रात उतरण्यास व पोहण्यास मज्जाव करणेबाबत तहसीलदारांच्या व स्थानिक पोलीस प्रशासनाच्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात असेही सूचित करण्यात आले आहे.
आणखी वाचा-नवी मुंबई : चौदा गावांना लवकरच सुविधा; आपला दवाखाना, आरोग्य केंद्रे उभारण्याच्या सूचना
नवी मुंबई शहराला प्रतिदिन ४५० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण काठोकाठ भरत असल्याने ही नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. यंदा जोरदार पाऊस पडत असून गेल्यावर्षी मोरबे धरण भरण्यासाठी २५ सप्टेंबर २०२३ उजाडला होता यंदा धरण जवळजवळ १ महिना अगोदरच भरत असल्याने नवी मुंबई नागरीकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
मागील काही दिवसापासून मोरबे धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असून धरण केव्हाही भरण्याची शक्यता असल्याने खालापूर तहसीलदार व तेथील स्थानिक प्रशासन व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्यावर्षीपेक्षा मोरबे धरणात यंदा पहिल्या तीन महिन्यातच चांगला पाऊस झाला असून धरण गेल्यावर्षी पेक्षा एक महिना अगोदरच भरणार असल्याचे चित्र आहे. -अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता ,नवी मुंबई महापालिका