नवी मुंबई : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील उपयुक्त जलसाठा सातत्याने वाढत आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सध्या धरणात ७७.८४ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून, मान्सूनच्या उर्वरित कालावधीत पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस कायम राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, शहरात सरासरी ७.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या कालावधीत बेलापूरमध्ये ६.२०, नेरुळमध्ये ३.४०, ऐरोलीमध्ये ९.२०, कोपरखैरणेत ६.८० आणि वाशीमध्ये २.६० मिलिमीटर पाऊस झाला. १ जूनपासून शहरात आतापर्यंत १,९०८.४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत शहरात दोन ठिकाणी झाडे कोसळण्याच्या तसेच अग्निशमन विभागाकडे आगीच्या दोन घटनांची नोंद झाली. शहरात मोठ्या स्वरूपाची कोणतीही आपत्तीजनक घटना घडली नसली तरी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी, पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आवश्यक असलेला उर्वरित सुमारे २२ टक्के जलसाठा येत्या काही दिवसांत उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पाणलोट क्षेत्रातील पावसावर मोरबे धरणाची भिस्त

मोरबे धरणातील जलसाठा वाढण्यामागे पाणलोट क्षेत्रातील पाऊस निर्णायक ठरतो. गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३४.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत या परिसरात एकूण २,३९६.८० मिलिमीटर पाऊस झाला आहे. सध्या धरणाची जलपातळी ८३.४४ मीटर असून उपयुक्त जलसाठा ७७.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहराच्या तुलनेत पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस झाल्याने धरणातील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, आगामी काळातही समाधानकारक पाऊस कायम राहिल्यास मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता अधिक बळावणार आहे.