scorecardresearch

Premium

मोरबेच्या जलपूजनाची घाई; नाईकपुत्र अडचणीत, पालिकेच्या परवानगीविना पूजाविधी; घुसखोरीबद्दल प्रशासनाची तक्रार

गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच काठोकाठ भरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाच्या जलपूजनावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

morbe dam pooja
मोरबेच्या जलपूजनाची घाई; नाईकपुत्र अडचणीत

नवी मुंबई : गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच काठोकाठ भरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाच्या जलपूजनावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. पालिकेची परवानगी न घेताच नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांनी दोन माजी महापौरांसह मोरबे येथे जाऊन जलपूजन विधी उरकला. याला पालिका प्रशासनाने आक्षेप घेतला असून संजीव नाईक यांच्यासह तिघांवर घुसखोरीबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण २०२१नंतर प्रथमच १०० टक्के क्षमतेने भरले. धरणातील पाणीसाठा कमी असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईत पाणीकपात सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर धरण भरल्याच्या वार्तेने रविवारी शहरवासीयांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. महापालिका प्रशासनानेही धरणाचे जलपूजन करण्याचा निर्णय घेतला. त्याची तारीख सोमवारी निश्चित करण्याचेही ठरले. असे असताना माजी मंत्री व भाजप नेते आमदार गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक, पुतणे सागर नाईक तसेच समर्थक सुधाकर सोनावणे यांनी प्रशासनाला कोणतीही सूचना न देता रविवारी सकाळी मोरबे धरण गाठले. तसेच सुरक्षारक्षकांना प्रवेशद्वार उघडायला लावत या ठिकाणी जलपूजनाचा विधीही उरकून टाकला.

Goon of Chota Rajan gang
मुंबई : छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक, २९ वर्षांपूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी
reservoir at Malabar Hill
हँगिंग गार्डनमध्ये आरेची पुनरावृत्ती नको, मलबार हिलच्या नागरिकांनी व्यक्त केली भीती
unique celebration of birth of girl child in the thergaon hospital
महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत; बालिकेच्या ‘सुकन्या समृद्धी’ खात्यात डॉक्टरांकडून बचत
28 year old woman who kidnapped 18 month child arrested within 12 hours
मुंबईः दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला १२ तासांत अटक; मुलाची सुखरूप सुटका

नाईक यांच्या या कृत्याबद्दल पालिकेच्या प्रशासकीय वर्तुळातून नाराजी व्यक्त होत आहे. पालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असून जलपूजनाबाबतचा निर्णय आयुक्तच घेऊ शकतात. तसेच संजीव नाईक आणि त्यांच्याबरोबरच्या नेत्यांकडे सध्या कोणतेही संवैधानिक पद नाही. असे असताना या मंडळींना धरणासारख्या संवेदनशील क्षेत्रात प्रवेश कसा मिळाला, असा प्रश्न रविवारी दिवसभर विचारला जात आहे.

या पाश्र्वभूमीवर महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने खालापूर पोलिसांना एक पत्र दिले आहे. संजीव नाईक यांच्यासह अन्य मंडळींवर धरणक्षेत्रात घुसखोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी अभियांत्रिकी विभागाने केली आहे. या ‘घुसखोरी’ची चित्रफीत असलेला पेन ड्राइव्ह आणि अन्य पुरावेही पालिकेने पोलिसांकडे दिले आहेत. खालापूर पोलिसांनी या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नसला तरी पालिकेने केलेल्या अधिकृत तक्रारीमुळे पोलिसांवर कारवाईसाठी दबाव वाढला आहे. 

 काँग्रेसची टीका

हे जलपूजन नियमबाह्यपणे करण्यात आल्याचे सांगत काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. बेकायदा जलपूजन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

आम्हाला सर्व नगरसेवक जलपूजनाला येणार असल्याचे वाटले. त्यामुळे आम्ही जलपूजनाला गेलो. पालिकेने बेकायदा जलपूजन केल्याबद्दल आमच्यावर कारवाई जरूर करावी; परंतु हीच तत्परता सामान्य जनतेच्या कामासाठीही दाखवावी. या घटनेचे राजकारण केले जात आहे. – सुधाकर सोनावणे, माजी महापौर

मोरबे येथे करण्यात आलेल्या जलपूजनाबाबत पालिका अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती घेतली जात आहे. पालिकेने खालापूर पोलीस ठाण्याला पत्र दिले असून मोरबे धरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनाही या प्रकाराबाबत खुलासा करण्याचे पत्र दिले आहे. सविस्तर माहिती प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. – राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Morbe dam water worship naik son in trouble worship without the permission of the municipality ysh

First published on: 26-09-2023 at 02:14 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×