‘समान काम, समान वेतना’ची मागणी; सोमवारपासून कामबंद आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई : कंत्राटी कामगारांना २००७ पासून महापालिका प्रशासन ‘समान काम, समान वेतन’ निश्चित करीत असून अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने बुधवारी समाज समता कामगार संघटनेच्या नेतृत्वात महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांना मागण्यांचे निवेदन दिले असून शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय न झाल्यास सोमवारपासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेत एकच काम करीत असताना कायम कामगारांना ३३ हजार तर कंत्राटी कामगारांना १८ हजार वेतन मिळत आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांनी अनेकदा आंदोलन केले आहे. मात्र याबाबत अद्याप निर्णय घेण्यात न आल्याने हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी सर्व कामगारांना २३ मार्च २०२० पासून कोविड कालावधीत केलेल्या कामासाठी ३०० रुपये कोविड भत्ता मिळावा, १ सप्टेंबर २०२१ पासून घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व गटातील मुकादम यांना त्यांच्या मुळ पदावर म्हणजेच सफाई कामगार नेमावे आणि जे कामगार गैरहजर असतील त्यांची हजेरी पटावर गैरहजेरी लावावी. तसेच कामाच्या ठिकाणी करोनाची लागण होऊन मृत्यू पावलेल्या ११ मयत कामगारांना महापालिकेच्या धोरणाप्रमाणे आणि शासन निर्णयाप्रमाणे ७५ लाखांची भरपाई मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या.

शुक्रवारी पालिका आयुक्त बैठक घेणार असून यात निर्णय अपेक्षित आहे. तसे न झाल्यास सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे समाज समता कामगार संघटनेचे  सरचिटणीस मंगेश लाड यांनी सांगितले.

ठोक मानधनावरील कर्मचारीही प्रतीक्षेत

महापालिकेतील ठोक मानधनावरील जवळजवळ ६०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना समान काम देण्याची मागणी वारंवार केली जात आहे. त्यांचेही शुक्रवारी होणाऱ्या बैठकीकडे लक्ष लागून आहे. पालिकेत शिक्षक, आरोग्य, प्रशासन, पाणीपुरवठा तसेच पालिकेच्या विविध विभागांत जवळजवळ ६५० कर्मचारी ठोक मानधनावर कार्यरत आहेत. परंतु अनेक वर्षांपासून हे कर्मचारी कायम सेवेत घेण्याचसाठी प्रयत्नशील आहेत. यातील अनेक शिक्षक तसेच विविध विभागांतील कर्मचारी हे गेल्या १० वर्षांपासून कार्यरत आहेत. परंतु त्यांना समान काम करावे लागत असून समान वेतनापासून ते वंचित आहेत. त्यामुळे  तेही सातत्याने प्रयत्न करत आहेत.

कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत पालिका प्रशासन सकारात्मक असून याबाबत पालिका आयुक्त व अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक घेण्यात येणार आहे. त्यात कंत्राटी कामगारांच्या या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

   -सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, महापालिका