संतोष सावंत, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल : ‘हायवे ब्रेक’ या हॉटेलला लागलेल्या आगीच्या घटनेमुळे खारघरमधील तीनशेहून अधिक हॉटेले व उपाहारगृह चालकांनी सिडकोच्या अग्निशमन यंत्रणेने सुचविलेल्या सर्व नियमांचे पालन केले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपत्तीवेळी सिडको अग्निशमन दलाची सेवा तातडीने हवी असणाऱ्या खारघरच्या शेकडो हॉटेल मालकांनी अद्याप या यंत्रणेकडून परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया केली नसल्याचे समोर आले आहे.

खारघरमधील रविवारी आगीच्या घटनेमुळे निवासी इमारतीमध्ये तळमजला आणि पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर चालणाऱ्या हॉटेल व उपाहारगृह चालकांमुळे संपूर्ण निवासी इमारतीला धोका होऊ शकतो असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. हॉटेल चालविण्यासाठी पोलीस, पनवेल पालिका, आरोग्य आणि अग्निशमन यंत्रणेच्या परवानगीची गरज असते. परंतु अद्याप खारघर नोडचे हस्तांतरण पनवेल महापालिकेकडे झाले नसल्याने हॉटेल व्यावसायिकांचे फावले आहे.

आणखी वाचा-पनवेल : नैना परिक्षेत्रामध्ये ‘युडीसीपीआर’बाबत राज्य शासन सकारात्मक, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन

खारघर उपनगर वगळता पनवेल महापालिका क्षेत्रातील इतर परिसरातील हॉटेल व उपहारगृह व्यावसायिकांना पनवेल पालिकेच्या अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी पालिकेवर अवलंबून राहावे लागते. सिडको मंडळाने पनवेल महापालिकेला खारघर वसाहत हस्तांतरण न केल्यामुळे खारघरचे अग्निशमन यंत्रणेकडून परवाना घेतल्यावर संबंधित हॉटेलमालकांनी हस्तांतरण झाल्यापासून परवानगीसाठी अर्ज केले नसल्याचे माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली.

खारघरमधील हॉटेलचालकांनी सिडकोच्या अग्निशमन दलाकडून काढलेल्या परवान्याचे नूतनीकरण करून घेणे अपेक्षित आहे. अग्निशमन दलाने सुचविल्याप्रमाणे यंत्रणा लावण्यासोबत ती यंत्रणा कार्यान्वित आहे का याची तपासणी वेळोवेळी करणे तेवढेच गरजेचे आहे. हॉटेलच्या जागेत हवा खेळती राहावी, आपत्तीवेळी स्वतंत्र दरवाजे असावेत यासोबत हॉटेलमधील गिऱ्हाईक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार होणे गरजेचे आहे, असे अग्निशमन अधिकारी पी. पी. बोडके यांनी सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than 300 hotels were negligent in security mrj
First published on: 13-02-2024 at 14:08 IST