नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा एक महत्त्वाचा आणि राजकीय पक्षांसाठी विचार करायला लावणारा कल समोर आला आहे. शहरातील ७१ हजार ५५० मतदारांनी ‘वरील पैकी एकही नाही’ अर्थात नोटा (NOTA) हा पर्याय निवडला आहे.

नवी मुंबईत २८ प्रभागांमध्ये १११ नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक पार पडली. महापालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार शहरात एकूण ९ लाख ४८ हजार ४६६ मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ लाख ४२ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच एकूण मतदान टक्केवारी समाधानकारक असली, तरी त्यामधील मोठा वाटा नोटाचा राहिला. ७१ हजार ५५० मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.

महापालिका निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या लक्षणीय मानली जात असून, प्रत्येक प्रभागात सरासरी हजारो मते नोटाकडे गेल्याचे चित्र आहे. काही प्रभागांमध्ये विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील मतांचा फरक कमी असताना, नोटाला मिळालेली मते निर्णायक ठरू शकली असती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राजकीय निरीक्षकांच्या मते, उमेदवारांची गुणवत्ता, स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष, पक्षांतील अंतर्गत गटबाजी तसेच काही ठिकाणी घराणेशाही किंवा वारंवार तेच चेहरे समोर येणे, या कारणांमुळे मतदारांनी थेट नोटाचा पर्याय निवडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत मतदारांना अनेक उमेदवारांपैकी निवड करावी लागत असल्याने, ‘कोणालाच मत द्यायचे नाही’ अशी भूमिका काही मतदारांनी घेतल्याचेही बोलले जात आहे.

प्रभाग क्रमांक २५ क मध्ये सर्वाधिक ‘नोटा’चा वापर

प्रभाग क्रमांक २५ क मध्ये मतदारांनी ‘नोटा’ ला सर्वाधिक पसंती दिली. या प्रभागात ‘नोटा’ला एकूण २,३९८ मत मिळाली. या प्रभागातून भाजपच्या उमेदवार नेत्रा शिर्के ८६३१ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार शिवसेनेच्या (शिंदेगट) ऍड. सुजाता गुरव यांना ४७२८ मते मिळाली. म्हणजेच भाजपच्या उमेदवार केवळ ३९०३ मतांनी निवडून आला. याचाच अर्थ ‘नोटा’ ला मिळालेली २३९८ मते ही या दोन्ही उमेदवारांच्या विजयात निर्णायक ठरण्याची शक्यता होती.