गळक्या छपरातून धो धो पाणी; सिडको-रेल्वे प्रशासनाच्या वादात दुरुस्ती रखडली
पावसाळ्यात धबधबे पाहण्यासाठी दूरवरचा प्रवास करीत जिवाला त्रास करून घेण्याऐवजी थेट ट्रान्सहार्बरवरील स्थानकांमध्येच स्वस्तात आनंद घेतला तर, पैसाही वाचेल आणि वेळही. तशी सोय रेल्वे प्रशासन आणि सिडको केली आहे. ठाणे-वाशी-पनवेल मार्गावरील ऐरोली, घणसोली, नेरुळ आणि जुईनगर रेल्वे स्थानकांत सध्या प्रवाशांना भर पावसात स्थानकात भिजून प्रवास करावा लागत आहे. ऐरोली रेल्वेस्थानकांतील फलाट क्रमांक दोन आणि घणसोली रेल्वे स्थानकांतील प्रवेशद्वाराच्या छतातून पावसाचे पाणी झिरपून स्थानकात पाण्याची तळी साचली आहेत. जुईनगर स्थानकातील फलाट क्रमांक तीनमधील छतामधून गळती लागली आहे. यात स्थानकातील आसनेही जलमय होत असल्याने प्रवाशांना उभी राहायची शिक्षा सहन करावी लागत आहे.
ऐरोली रेल्वे स्थानकात लोकल पकडताना सचैल स्नानाचा अनुभव घेऊनच प्रवास करावा लागत आहे. घणसोली रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारावर गळके छप्पर आहे. मुसळधार पावसात येथे काही काळ पाण्याचा धबधबाच अवतरत आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानक सिडकोने उभारली आहेत. रेल्वे लाइन आणि इंडिकेटर, तिकीट खिडकी या सुविधा रेल्वेने पुरवल्या आहेत.मागील काही दिवसांपासून हार्बर मार्गावरील सिडकोने बांधलेली रेल्वे स्थानके रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया न झाल्याने त्याची डागडुजी करायची कोणी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सिडको मात्र याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात रेल्वे प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात रेल्वे व्यवस्थापक अमित बोझा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ऐरोली रेल्वे स्थानकात पावसात गळती सुरू असल्याने अडोशाला उभे राहून रेल्वेची वाट पाहावी लागते, अशी प्रतिक्रिया उमेश गायकवाड यांनी दिली.

ज्या ठिकाणी गळती होत आहे. त्या ठिकाणची दुरुस्ती करण्यात येईल. सिडकोकडून रेल्वे स्थानक रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण रेल्वे हस्तांतरित करून घेण्यास तयार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्याचे यासंदर्भात रेल्वेशी बोलणे सुरू आहे.
के. एन. गोडबोले, अधीक्षक अभियंता सिडको