ऐरोलीतील मच्छीमारांचे आंदोलन स्थगित

नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वाराजवळ दक्षिण मुंबईतून स्थलांतरित करण्यात आलेला मासळी बाजार हटविण्यासाठी मुंबई परिमंडळ सातचे पोलीस प्रयत्न करतील, असे आश्वासन देण्यात आल्याने गुरुवारी रात्री दहा वाजता होणारे मच्छीमारांचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

हा नवीन बाजार त्वरित बंद करण्यात यावा यासाठी कोळी महासंघाच्या वतीने गुरुवारी रात्री आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यात महिलांचा सर्वाधिक समावेश राहणार होता. त्यामुळे पोलिसांनी हे आंदोलन न करण्याचा सल्ला कोळी महासंघाला दिला. संघाने दीड ते दोन हजार आंदोलनकर्त्यांची तयारी केली होती. साथ रोग नियंत्रण कायदाने पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी देखील दिलेली नव्हती.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मंडई (क्रॉपर्ड) मधील मासळी बाजार काही दिवसांपूर्वी मुलुंड-ऐरोली नाक्यावरील जुन्या जकात नाक्याच्या जागेत स्थलांतरित करण्यात आलेला आहे. घाऊक मासळीचा हा बाजार रात्री सुरू होऊन पहाटे आवरला जात असतो. या मासळी बाजारामुळे मुलंड, भांडुप, कांजूर मार्ग, ठाणे तसेच नवी मुंबईतील मासे विक्रेत्यांच्या व्यवसायावर गडांतर आलेले आहे. स्वस्त आणि मस्त मासळी घेण्यासाठी याभागातील नागरिक आता थेट या घाऊक बाजारात जात असल्याने मासे विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.

मुंबईतून आलेले हे मासळी विक्रेत्यामध्ये जास्तीत जास्त हे विनापरवाना धारक मासळी विक्रेते आहेत. मच्छीमार विक्रेत्यांच्या व्यवसाय अडचणीत आला आहे. या मासळी बाजारामुळे या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे हा बाजार हटविण्यात यावा अशी मागणी कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी केली आहे. हा बाजार त्वरित हटवावा यासाठी त्यांनी गुरवारी रात्री दहा वाजता या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनात जास्तीत जास्त महिला मासळी विक्रेत्यांचा समावेश राहणार होता. त्यामुळे हे आंदोलन होऊ नये यासाठी मुंबई परिमंडळ सातच्या पोलिसांनी हे आंदोलन न करण्याचा सल्ला दिला. यासंर्दभात पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निमाण होणार असल्याने पालिका अधिकाऱ्यांशी बोलून तोडगा काढणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठवडय़ात हा मासळी बाजार हटविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. बाजार इतरत्र हटविणार असल्यास आंदोलन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे पाटील यांनी सांगितले.