शासनाकडून १२ कोटींचा निधी जमा

मुंबई, नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरांपासून जवळ असूनही उरणमध्ये गेली २५ वर्षे चित्रपटगृह, नाटय़गृह नाही. त्यामुळे येथील रसिकांना नवी मुंबई गाठावी लागते. एकमेव टाऊन हॉलचीही पडझड झाली आहे. त्यामुळे आता दोन मल्टिप्लेक्स, एक नाटय़गृह, व्यापारी संकुल आणि मंगल कार्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून १२ कोटी रुपयांचा निधी उरण जमा करण्यात आला आहे.

उरणमध्ये १९८६ पर्यंत एक चित्रपटगृह होते, तर १९९६ नंतर नगरपालिकेने उभारलेल्या ९५० आसनांच्या राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र तो धोकादायक बनला आणि कार्यक्रम बंद पडले. याच जागी आता दोन मजली संकुल उभे राहणार आहे. या संकुलाची उभारणी करण्यासाठी १२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दोन वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती उरण नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी संदीप खोमणे यांनी दिली.

असे असेल संकुल

  • एकूण ४४ हजार चौरस मीटरवर दोन मजली इमारत उभारण्यात येणार आहे.
  • तळमजल्यावर व्यापारी संकुल व वाहनतळ, पहिल्या मजल्यावर ६०० आसनी आणि ७५ बाय ६० फुटाचे नाटय़गृह, कम्युनिटी सेंटर, वाचनालय, दुसऱ्या मजल्यावर २०० आसनांचे दोन स्वतंत्र मल्टिप्लेक्स उभारण्यात येणार आहेत. मंगल कार्यालयही उभारण्यात येणार आहे.
  • नवीन टाऊन हॉलच्या उभारणीनंतर वर्षांला १ कोटी ३९ लाख ४ हजार ३०० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणार असल्याचा दावा नगरपालिकेकडून करण्यात आला आहे.