नवी मुंबई : एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयानंतर नॉर्मलायझेशन, तांत्रिक सुविधा आणि परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व प्रलंबित प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, अशी भूमिका आयोगाने स्पष्ट केल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी गुरुवारी दिली.
सीबीडी बेलापूर येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आयोगाच्या अध्यक्षांसमवेत झालेल्या बैठकीनंतर महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. बैठकीला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना थेट आपल्या शंका व सूचना मांडण्याची संधी देण्यात आली.
ऑनलाइन परीक्षा पद्धतीमुळे नॉर्मलायझेशन, सुरक्षित सर्व्हर, तांत्रिक पायाभूत सुविधा आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या सर्व मुद्द्यांवर आयोगाच्या अध्यक्षांशी सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या सूचनांची दखल घेत आवश्यक उपाययोजना करण्याबाबत आयोगाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे महाडिक यांनी सांगितले.
परीक्षा कॅलेंडर लवकर जाहीर करण्याची मागणीही बैठकीत विद्यार्थ्यांनी केली. मात्र, विविध परीक्षांच्या तारखा एकमेकांशी टकराव होणार नाहीत, यासाठी नियोजनपूर्वक वेळापत्रक तयार करावे लागत असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
ऑनलाइन परीक्षा पद्धतीसाठी आवश्यक तांत्रिक पायाभूत सुविधा २०२७ पर्यंत उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतरच ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल, असे आश्वासन आयोगाने दिल्याचे महाडिक यांनी सांगितले. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रोहित पवारांवर टीका
एमपीएससीच्या ऑफलाइन-ऑनलाइन परीक्षा पद्धतीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याऐवजी त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम रोहित पवार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
