नवी मुंबई : महाराष्ट्रातील एमपीएससी नोकरभरतीतील घोटाळा हा मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा आहे. एमपीएससीची संपूर्ण व्यवस्था भ्रष्ट झाली असून विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षा पद्धतीवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा आणि ‘नॉर्मलायझेशन’ पद्धत तातडीने रद्द करून पारदर्शक ऑफलाइन परीक्षा घ्याव्यात; अन्यथा काँग्रेस राज्यभर तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी दिला.

सीबीडी बेलापूर येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मुख्यालयासमोर सीबीटी (CBT) आणि ‘नॉर्मलायझेशन’विरोधात काँग्रेसतर्फे सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर जोरदार टीका करत, “हे सरकार मुकं, बहिरं आणि आंधळं झालं आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेण्याची सरकारची इच्छाच दिसत नाही,” असे म्हटले. चार दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही सरकारचा किंवा एमपीएससीचा एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

ऑनलाइन परीक्षा पद्धतीवर गंभीर आक्षेप

एमपीएससीच्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सपकाळ म्हणाले, खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याचे कंत्राट दिल्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांचा या पद्धतीवरील विश्वास उडाला असून परीक्षा ऑफलाइन आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात. ऑनलाइन परीक्षा आणि ‘नॉर्मलायझेशन’ ही भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी व्यवस्था असल्याचाही त्यांनी आरोप केला.

देशातील विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीचा संदर्भ देत ते म्हणाले, “नीटचा पेपर वारंवार फुटला आहे. सरकारला साधी परीक्षा सुरळीत घेता येत नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे.” नोकरभरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

राज्यभर आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरू राहील, असे स्पष्ट करत सपकाळ म्हणाले की, बेलापूरपुरते आंदोलन मर्यादित राहणार नाही. राज्यभर या प्रश्नावर आंदोलन तीव्र करण्यात येईल. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर आंदोलनाचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रात पेटेल, असा इशारा त्यांनी दिला.

राम मंदिर प्रकरणावरूनही सरकारवर टीका

राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरूनही सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधला. “राम मंदिरातील चोरीचे प्रकरण अंगलट येत असल्याने त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरातील चोरीचा मुद्दा पुढे आणला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

सिद्धिविनायक मंदिरातील चोरीची चौकशी व्हावी; मात्र त्याचबरोबर राम मंदिरातील देणग्या आणि निधीतील कथित गैरव्यवहाराचाही उलगडा झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मौन बाळगत असल्याची टीकाही त्यांनी केली. राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या निषेधार्थ काँग्रेस राज्यभर आंदोलन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा दळवी, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रमुख धनंजय शिंदे, प्रदेश सरचिटणीस व नवी मुंबई प्रभारी मोनिका जगताप, प्रदेश सरचिटणीस गुरुचरण बच्छर, प्रवक्ते सय्यद नासीर हुसेन, संतोष शेट्टी, प्रदेश सचिव आनंद सिंग आदी उपस्थित होते.