आघाडीशिवाय पर्याय नसल्याने इच्छुकांच्या बंडखोरीची शक्यता

नवी मुंबई : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा राज्य सरकारने निर्णय जाहीर  केला आहे. नवी मुंबईत या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा फायदा शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांच्या महाविकास आघाडीला होणार असला तरी यात शिवसेनेला मोठा फटका सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

आगामी निवडणुकीत शिवसेनेला इच्छा नसताना महाविकास आघाडी करावी लागणार आहे. विशेष म्हणजे दीड वर्षे निवडणुका कधीही लागण्याची शक्यता लक्षात घेऊन लाखो रुपये खर्च करणाऱ्या अपक्ष उमेदवारांचा मात्र या बहुसदस्यीय निवडणूक पद्धतीत बाजार उठणार असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात मुंबई वगळता इतर दहा महापालिकांमध्ये बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीने बुधवारी जाहीर केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याचे दिसू लागले आहे. मुंबई पालिका निवडणुकीबरोबर या महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असून यात नवी मुंबईचा समावेश आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या निवडणुकीला आता जेमतेम पाच ते सहा महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. नवी मुंबई पालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक ही एप्रिल २०२० मध्ये होणार होती. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती. पण मार्चमध्ये देशात करोना साथ पसरू लागल्याने राज्यातील सर्वच संभाव्य निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने अनिश्चिात काळासाठी पुढे ढकललेल्या आहेत. या अनिश्चिात काळात नवी मुंबईला आता दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून प्रशासकाच्या हाती जास्त काळ कारभार न ठेवण्याच्या धोरणामुळे या निवडणुका फेब्रुवारी, मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी निवडणुका होणार असे गृहीत धरून चार प्रमुख पक्ष कामाला लागले होते. भाजपाला या निवडणुकीत पालिका सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी करण्याच्या आणाभाका जाहीर सभेत घेण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार १११ प्रभागांचे जागावाटप देखील करण्यात आले होते. सर्वसाधारपणे शिवसेनेला ६०, राष्ट्रवादीला ३०, आणि काँग्रेसला २१ असे जागावाटप देखील ठरलेले होते. पण त्यानंतर करोना काळ सुरू झाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. यावेळेस शिवसेनेला पालिका काबीज करण्याची संधी असल्याचा अहवाल काही खासगी सर्वेक्षण संस्था व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी मातोश्रीला दिला होता. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी करण्याची तयारी ठेवून अखेरच्या क्षणी जागावाटपावरून महाविकास आघाडी तोडण्याची व्यूहरचना आखण्यात आली होती. स्वबळावर निवडणुका लढल्यास पालिकेला साठपेक्षा जास्त जागा मिळण्याची खात्री असून बहुमतासाठी केवळ ५७ नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यासाठी शिवसेनेने भाजपामध्ये गेलेल्या काही प्रबळ नगरसेवकांना आपल्या गोटात आणले होते.

बहुसदस्यीय पद्धतीने एका पक्षाला इतर दोन पक्षातील उमेदवारांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आता महाविकास आघाडी करण्याशिवाय शिवसेनेला दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही. नवी मुंबईतील १११ प्रभागांचे आता बहुसदस्यीय पद्धतीत केवळ ३७ प्रभाग होणार असून या प्रभागांची मतदार संख्या वीस ते पंचवीस हजाराच्या घरात जाणार आहे. इतक्या मोठ्या प्रभागातील खर्च आणि लोकसंपर्काची ताकद अपक्ष व कमकुवत उमेदवारांची नसल्याने यात केवळ आर्थिकदृष्टया सक्षम असलेल्या उमेदवारांची वर्णी लागणार असून सर्वसामान्य कार्यकर्ता बाहेर फेकला जाणार आहे.

शिवसेनेच्या १११ प्रभागात असे सर्वसामान्य शिवसैनिक उमेदवार म्हणून संख्या जास्त आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ४० ते ५० इच्छुक उमेदवारांना नाराज करावे लागणार असल्याने हा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसणार आहे.