नवी मुंबई : सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसाचा परिणाम आता आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारांवरही दिसू लागला आहे. भाजीपाल्याची आवक नियमित असतानाही ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांचे प्रमाण घटल्याने बुधवारी बाजारातील उठाव मंदावला. त्यामुळे अनेक भाज्यांच्या घाऊक दरांत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून, भाजीपाला मोठ्या प्रमाणात बाजारातच पडून राहिला.

एपीएमसी भाजी बाजारात बुधवारी सुमारे ५५० वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाली. सामान्यतः मध्यरात्रीनंतर दाखल होणारा भाजीपाला सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत शहर व उपनगरातील व्यापाऱ्यांकडून तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून पूर्णपणे उचलला जातो. मात्र सततच्या पावसामुळे मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत पाणी साचले होते. त्यामुळे किरकोळ विक्रेते आणि ग्राहक बाजारात पोहोचू शकले नाहीत. परिणामी, दुपारपर्यंतही मोठ्या प्रमाणात माल विक्रीविना बाजारात पडून होता.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कैलास ताजने यांच्या मते, सततच्या पावसामुळे किरकोळ विक्रेते बाजारात येऊ शकले नाहीत. मागणी घटल्याने घाऊक बाजारातील अनेक भाज्यांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाले. ही घसरण आवकेतील कमतरतेमुळे नसून ग्राहकांच्या अनुपस्थितीमुळे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर बाजारातील व्यवहार पूर्वपदावर येतील आणि दरही स्थिर होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, घाऊक दर घसरले असले तरी त्याचा तातडीने किरकोळ बाजारावर किती परिणाम होईल, हे पुढील काही दिवसांतील परिस्थितीवर अवलंबून राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास किरकोळ विक्रीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आवक सुरळीत असूनही मागणी घटल्याने निर्माण झालेली ही परिस्थिती भाजीपाला व्यापारासाठी चिंतेची बाब ठरत आहे.

पाणी साचल्याने अडथळा

पावसाचा फटका केवळ विक्रीपुरता मर्यादित राहिला नाही. एपीएमसीच्या भाजी, फळ आणि मसाला बाजार परिसरात अनेक ठिकाणी दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने व्यापारी, माथाडी कामगार आणि ग्राहकांना पाण्यातून मार्ग काढत व्यवहार करावे लागले. मालाची उचल प्रक्रिया आणि वाहतूक संथ गतीने सुरू राहिली. तर काही वाहनांमध्ये बिघाड झाल्याचेही आढळले. त्यामुळे बाजारातील प्रत्यक्ष दैनंदिन व्यवहारांवर याचा परिणाम जाणवला.

व्यापारी, शेतकऱ्यांचे नुकसान

बाजारात पाणी साचण्याची ही पहिली वेळ नसून दरवर्षी बाजारात पाणी साचून भाजीपाला आणि फळांचे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, शेतमालाला पाणी लागल्याने माल झपाट्याने सडत असल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचेही नुकसान होत असल्याचे मत भाजीपाला व्यापारी सुनील वाकचौरे यांनी व्यक्त केले.

प्रशासनात समनव्याचा अभाव

भाजीपाला-फळ बाजार सखल भागात असल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या दरवर्षी निर्माण होते. असे असतानाही एपीएमसी प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून या समस्येची योग्य दखल घेतली जात नसल्याचा आरोप बाजार घटकांनी केला आहे. दोन्ही प्रशासनाकडून नालेसफाईचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती कायम असून, दोन्ही प्रशासनांतील समन्वयाच्या अभावामुळे बाजारपेठेचे नुकसान होत असल्याचा आरोप बाजार घटकांनी केला आहे.

बुधवारचे घाऊक भाजीपाला दर (प्रति किलो) :

टोमॅटो            १८ ते २२ रुपये

फरसबी            ५५ ते ६५ रुपये

फ्लॉवर             १२ ते १६ रुपये

भेंडी                   २६ ते ३२ रुपये

तोंडली              २६ ते ३० रुपये

गवार                 ३० ते ४० रुपये

कोबी                 १२ ते १६ रुपये.

पालक              ६ ते ७ रुपये

कोथिंबीर         १६ ते २० रुपये

मेथी                  १६ ते २० रुपये

कांदापात         १५ ते १६ रुपये

पुदिना              ४ ते ५ रुपये

शेपू                १० ते १५ रुपये.