नवी मुंबई : कांदा-बटाटा बाजारात ५० किलो वजन्मर्यादेवरून माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या वादावर तात्पुरता तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. माथाडी कामगारांनी आता ५२ किलोपर्यंत वजन असलेल्या गोण्या उतरविण्यास तयारी दर्शवली असून, व्यापाऱ्यांनी बाजारातील व्यवहार पुन्हा सुरू करावेत, अशी विनंती माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे. दरम्यान, या प्रश्नावर मंगळवारी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत बैठक होणार असून, त्यात होणाऱ्या निर्णयानंतर पुढील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.

५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या उचलण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी कांदा-बटाटा बाजारातील व्यवहारावर परिणाम झाला होता. त्यानंतर शुक्रवारी व्यापारी आणि माथाडी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवला, तर माथाडी कामगारांनी ५० किलो वजन्मर्यादेची अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे बाजार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून ५० किलो वजन्मर्यादेच्या अंमलबजावणीवरून बाजारात तणावाचे वातावरण आहे. शासनाच्या आदेशानुसार ५० किलो वजनाच्या गोण्या बाजारात आणण्याची मागणी माथाडी कामगारांकडून केली जात आहे. मात्र नाशवंत मालाच्या गोण्यांमध्ये वजन काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने त्याबाबत व्यवहार्य तोडगा काढण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. त्यातून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या उचलण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये मतभेद निर्माण झाले.

या वादाच्या पार्श्वभूमीवर माथाडी कामगारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने कांदा-बटाटा बाजार परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस आणि बाजार समितीने हस्तक्षेप केल्यानंतर व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू करण्यात आली. चर्चेअंती माथाडी कामगारांनी ५२ किलोपर्यंतच्या गोण्या उतरविण्याची तयारी दर्शविल्याने बाजार सुरू करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी अंतिम निर्णयाची शक्यता

५२ किलोपर्यंतच्या वजनाबाबत तात्पुरती भूमिका घेत असताना, वजन्मर्यादेचा अंतिम निर्णय मंगळवारी होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. पणन मंत्र्यांसोबतच्या बैठकीत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी, नाशवंत मालाचे वजन आणि माथाडी कामगारांच्या कामाच्या स्वरूपाबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो, यावर कांदा-बटाटा बाजारातील पुढील व्यवहार अवलंबून राहणार आहेत.

“आम्ही ५२ किलोपर्यंत वजनमर्यादा असलेल्या गाड्यांचा माल उतरविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत जो निर्णय होईल, त्यानंतर पुढील भूमिका आम्ही स्पष्ट करू.” – नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते