नवी मुंबई : कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी होऊनही वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात खरेदीदारांची वानवा कायम आहे. त्यामुळे बाजारात मंदीचे सावट निर्माण झाले आहे. कांद्याचे दर १० ते १२ रुपये किलोपर्यंत उतरले असूनही अपेक्षित उठाव न मिळाल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघेही चिंतेत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून हॉटेल व्यवसाय मंदावल्याचा थेट परिणाम कांद्याच्या मागणीवर दिसून येत आहे. शहरातील काही भागांत गॅस सिलिंडर पुरवठ्यातील अडचणी आणि त्यातून निर्माण झालेल्या मर्यादांमुळे लहान-मोठ्या हॉटेल व उपाहारगृहांचे कामकाज मंदावले आहे. परिणामी कांद्याचा मोठा ग्राहक वर्ग कमी झाल्याने बाजारातील खरेदीवर परिणाम झाला आहे.

मुंबई एपीएमसी बाजारात दररोज साधारणतः १०० ते १५० लहान-मोठ्या वाहनांमधून कांद्याची आवक होते. मात्र त्या तुलनेत खरेदी अत्यंत कमी असल्याने माल साठून राहत आहे. पूर्वी सहज विकला जाणारा कांदा आता बाजारात खरेदीदारांच्या प्रतीक्षेत पडून राहत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. चार दशकांपासून या व्यवसायात असलेल्या काही व्यापाऱ्यांच्या मते, अशी स्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. मालाचा पुरवठा सुरू असला तरी तो उचलण्यासाठी ग्राहक नसल्याने बाजारातील व्यवहार मंदावले आहेत. त्यामुळे दैनंदिन उलाढालीवरही ताण जाणवत आहे.

दर घसरले असतानाही मागणी वाढत नसल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. निर्यात थांबल्यामुळे अतिरिक्त कांदा देशांतर्गत बाजारात साचत असून पुरवठा वाढलेला आणि मागणी घटलेली अशी दुहेरी स्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम दरांवर दिसून येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या बाजूने परिस्थिती अधिक गंभीर आहे. एक एकर कांदा उत्पादनासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येत असून सध्याच्या दरांमध्ये तो खर्चही भरून निघत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या आर्थिक तोट्यात सापडले आहेत.

दोन दशकांपूर्वी एकरी उत्पादन खर्च सुमारे तीस हजार रुपये होता. मात्र आता तो तीनपट वाढून एक लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. खर्चात झालेली वाढ आणि उत्पन्नातील अपेक्षित वाढ न झाल्याने शेतकरी आणि व्यापारी दोघेही दबावाखाली आले आहेत.
एकूणच, दर घसरूनही मागणी न वाढल्याने मुंबई एपीएमसीच्या कांदा-बटाटा बाजारात मंदीचे सावट अधिक गडद झाले असून संपूर्ण पुरवठा साखळीवर त्याचे परिणाम दिसून येत आहेत.

कांद्याचे दर (प्रति किलो)
कांदा क्र. १ : १० ते १२ रुपये
कांदा क्र. २ : ८ ते १० रुपये

गोलटा मोठा : ६ ते ७ रुपये

गोलटी छोटा : ४ ते ५ रुपये

चोपडा निवड : २ ते ४ रुपये