उरण : मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबागच्या रेवसदरम्यान पावसाळ्यात चार महिने बंद करण्यात आलेली प्रवासी वाहतूकसेवा गुरुवार १ आक्टोबरपासून पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच उरणच्या करंजा ते रेवस जलमार्गावरील ताणही कमी होणार आहे.
दरवर्षी २६ मे पासूनच भाऊचा धक्का ते रेवस तसेच मोरा ते भाऊचा धक्का, गेट वे ते मांडवा या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात येते आणि सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा सुरू केली जाते. मोरा ते भाऊचा धक्का, गेटवे ते मांडवा या दरम्यानची सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. मात्र भाऊचा धक्का ते रेवस या मार्गावरील प्रवासी वाहतूक बोट सेवा अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. सातत्याने बदलणारे हवामानामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून ही प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली नव्हती, अशी माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली. दरम्यान सध्याचे वातावरण सागरी वाहतुकीसाठी अनुकूल झाल्याने मागील चार महिने बंद करण्यात आलेली प्रवासी बोट वाहतूक सेवा १ आक्टोबरपासून पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.
बोटींच्या वेळा
मुंबई – रेवस या सागरी मार्गावरील तिकीट दर १०० रुपये आहे. भाऊचा धक्का येथून १ आक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता पहिली बोट सुटणार आहे. त्यानंतर ८.००, १०.००, १२.००, दुपारी ४.०० व ५.०० अशा वेळेत बोटी सोडण्यात येतील. दरम्यान वातावरण बदल व खराब हवामानामुळे बोटींच्या वेळापत्रकात बदल केला जाईल, अशी माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेने दिली.
