पनवेल – मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लाखो वाहनचालकांना आता खारपाडा येथील पहिल्या टोलनाक्याची पावतीचे शुल्क देऊनच पुढे जावे लागणार आहे. शुक्रवारी सकाळपासून या टोलची सुरूवात केली. टोलवसुली सुरू होणार आहे म्हणून अगोदर सुविधा त्यांना टोल वसुली करा अशी राजकीय पक्षांची मागणी होती. मात्र महामार्गापासून २० किलोमीटर अंतरावरील वाहनमालकांना मासिक सवलतीचा पास देण्यापूर्वीच हा टोलधाड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केली.

ही टोलवसुली खारपाडा ते कासू या ४२ किलोमीटर अंतरावरील महामार्गाची केली जात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम आणि सुविधा पूर्ण नसतानाच उन्हाळी सुट्यांमध्ये गावी जाणा-यांची संख्या वाढली असतानाच टोलवसुली सुरू झाल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही महामार्गावरील कामे संथ गतीने सुरू असून, रूग्णवाहिका, शौचालये, स्थानिक वाहनांना टोलमधून सवलत अशा मूलभूत सुविधा अपुऱ्याच असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खारपाडा टोलनाक्यावर स्थानिक रहिवासी आणि सर्व एलएमव्ही वाहनांसाठी टोलमाफी लागू करण्याची घोषणा केली. मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांसह स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.त्यामध्ये स्वच्छ व कार्यरत शौचालये, महिलांसाठी व बालकांसाठी स्तनपान कक्ष, आपत्कालीन रुग्णवाहिका व प्रथमोपचार केंद्र, खराब वाहनांसाठी क्रेन सेवा, सुरक्षित व प्रकाशयुक्त दुतर्फा रस्ता तसेच टोल व्यवस्थापनात स्थानिक युवकांना रोजगार देण्याची प्रमुख मागणी आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते शुक्रवारी (ता. १५) खारपाडा टोलविरोधात आंदोलनासाठी निघाले असता पळस्पे फाटा येथे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या पोलीस पथकाने त्यांना रोखून कार्यकर्त्यांची त्यांनी समज काढली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याने शुक्रवारी टोलवसुलीचे बुथ आणि मनसेमधील संघर्ष टळल्याची माहिती मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी दिली. 

पुढील दहा दिवसांत सर्व अपूर्ण सुविधा कार्यान्वित करून मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच टोल आकारणी सुरू झाल्याने “सुविधा आधी, टोल नंतर” अशी भूमिका आता अधिक तीव्र होत आहे. परंतू शुक्रवारपासून कोकणवासियांचा पहिला टोल मुंबई गोवा महामार्गावर सुरू झाला.