पनवेल – मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळणे आणि महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे सोमवारी सकाळपासून कळंबोली येथून द्रुतगती महामार्गावरील प्रवेश काही काळासाठी बंद करण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला असून अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन वाहनचालकांना करण्यात आले आहे.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा येथील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळली आहे. तसेच द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. रविवारी रात्रीपासून पावसाबरोबरच वाऱ्याचाही वेग वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून आणखी वाहने या मार्गावर येऊ नयेत, यासाठी कळंबोली येथून सुरू होणारा द्रुतगती महामार्ग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवी मुंबई वाहतूक पोलीस दलाचे उपायुक्त राहुल खाडे यांनी नागरिकांना अत्यावश्यक काम असल्याशिवाय प्रवास करू नये, असे आवाहन केले आहे. मुंबई–पुणे किंवा मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी जुन्या मुंबई–पुणे महामार्गाचा वापर करावा. मात्र त्या मार्गावरही वाहतुकीस अडथळे असल्याने पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच प्रवास करणे अधिक सुरक्षित ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
द्रुतगती महामार्ग बंद झाल्याने कळंबोली सर्कलजवळील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कळंबोली सर्कलच्या विस्ताराचे काम सुरू असल्याने या परिसरातील महामार्ग आधीच अरुंद झाला असून त्यामुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाची माहिती देण्यासाठी कळंबोली वाहतूक पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे (भोंग्याव्दारे) सूचना दिल्या जात आहेत. वाहनचालकांकडूनही पोलिसांना सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले. द्रुतगती महामार्ग बंद केल्यामुळे कळंबोली परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली असली, तरी सुरक्षिततेला प्राधान्य देत ही उपाययोजना करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.
