पनवेल – मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळणे आणि महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे निर्माण झालेला वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सोमवारी सकाळी कळंबोली येथून द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तासासाठी बंद करण्यात आली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वाहतूक पोलिसांनी एक तासाच्या उसंतीनंतर पावणेदहा वाजता महामार्गावरील एक मार्गिका वाहनांसाठी सुरू केली असून वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा येथील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळली. तसेच द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. रविवारी रात्रीपासून पावसाबरोबरच वाऱ्याचाही वेग वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दरड कोसळलेल्या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू झाले. दरम्यान वाहनांची संख्या आणखी वाढू नये आणि महामार्गावरील ताण कमी व्हावा, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी कळंबोली येथून सुरू होणारी वाहतूक सुमारे एक तासासाठी थांबवली. त्यानंतर परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्यानंतर एक मार्गिका सुरू करण्यात आली. या मार्गिकेतून वाहने नियंत्रित पद्धतीने सोडली जात असून वाहतुकीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
नवी मुंबई वाहतूक पोलीस दलाचे उपायुक्त राहुल खाडे यांनी नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. मुंबई–पुणे तसेच मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी शक्य असल्यास प्रवास पुढे ढकलावा किंवा वाहने बाजूला लावून उसंत घ्यावी. जुन्या मुंबई–पुणे महामार्गाचा वापर करावा.
मात्र त्या मार्गावरही वाहतुकीचा ताण असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कळंबोली सर्कल परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक पोलिसांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे वाहनचालकांना पर्यायी मार्गांची माहिती दिली जात आहे. वाहनचालकांकडूनही पोलिसांना सहकार्य मिळत असून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
