कृषी उत्पन्न बाजार आवारातील धान्य बाजारात व्यापार भवनच्या शेजारी एका धार्मिक कार्यक्रमासाठी शेड बांधण्याची परवानगी एपीएमसीने दिली होती. मात्र, परवानगीची मुदत उलटून देखील शेड न काढल्याने महापालिका तुर्भे विभागाच्यावतीने बुधवारी सदर शेडवर तोडक कारवाई करण्यात आली.

हेही वाचा- लवकरच नवी मुंबईकरांना मिळणार डबल डेकरची सफर ! एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत डबल डेकर बस दाखल

धान्य बाजारातील व्यापार भवनच्या शेजारी एका धार्मिक कार्यक्रमासाठी एपीएमसी प्रशासनाने एका सामाजिक संस्थेला १८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर अशी अटी शर्थिच्या अधीन राहून १५ दिवसांची परवानगी देण्यात आली होती. परवानगीचा कालावधी संपल्यानंतर सदर बांधकाम परवानगी धारकाने स्वतःहून काढणे बंधनकारक होते. मात्र त्यांनी ते बांधकाम हटवले नाही. त्यामुळे याठिकाणी बांधकाम काढण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने समज पत्र तर महापालिकेने नोटीस देऊन चेतावणी दिली होती. मात्र, तरी देखील सदर बांधकाम जैसे थेच होते. त्यामुळे बुधवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी महापालिका तुर्भे विभागाच्यावतीने सदर बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली. या ठिकाणी शेड उभारणी करता झाडे तोडल्याच्या तक्रारी महापालिकेच्या तुर्भे विभागात करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने तुर्भे विभाग अधिकारी यांनी एपीएमसीला नोटीस बजावली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: नियोजित रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या बेकायदा शेडवर कारवाई

याठिकाणी अनधिकृतपणे शेड उभारण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे .तसेच या ठिकाणी झाड तोडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे एपीएमसीला याबाबत नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती तुर्भेचे विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांनी दिली.