लोकसत्ता टीम
नवी मुंबई: घनकचरा व्यवस्थापनातील कच-याची विल्हेवाट हा एक अत्यंत महत्वाचा घटक असून तुर्भे एमआयडीसी परिसरातील नवी मुंबई महानगरपालिकेचा शास्त्रोक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा देशातील एक उत्तम प्रकल्प म्हणून नावाजला जातो. तथापि स्वच्छता ही नियमीत करण्याची गोष्ट असून स्वच्छता प्रक्रियेत अधिकाधिक सुधारणा करणे गरजेचे आहे या भूमिकेतून नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर शहर स्वच्छतेप्रमाणेच घनकचरा विल्हेवाटीकडेही बारकाईने लक्ष देत आहेत. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करूनच द्यावा असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.




नार्वेकर यांनी शहर अभियंता संजय देसाई व पर्यावरण विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड व संबधित अधिकाऱ्यांसह घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची बारकाईने पाहणी केली.
नागरिकांकडून कचऱ्याचे निर्मितीच्याच ठिकाणी वर्गीकरण करण्यावर महानगरपालिकेच्या वतीने भर देण्यात येत आहे. हे नागरिकांकडून अपेक्षित करताना नागरिकांकडून संकलित केलेला वर्गीकृत कचरा हा संकलन आणि वाहतुक करतेवेळी एकत्र होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.वर्गीकरण न करता येणारा कचरा प्रकल्पस्थळी आल्यावर वर्गीकरण करावा लागतो हे ध्यानात घेऊन नागरिकांनी आपल्या स्तरावर कचरा वर्गीकरण न केल्यामुळे प्रकल्पस्थळी आपल्या स्वच्छताकर्मींना तो वेगळा करावा लागतो हे ध्यानात घेऊन स्वच्छतामित्रांचे काम आपल्यामुळे वाढणार नाही याची दक्षता घ्यावी व आपल्या घरातच कचरा टाकताना तो ओला व सुका अशा वेगवेगळया डब्यात टाकावा व स्वच्छताकर्मींना त्यांच्या कामातून काही प्रमाणात दिलासा दयावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
प्रकल्पस्थळी काम करीत असलेल्या कामगारांचे आरोग्य व त्यांच्या सुरक्षाविषयक बाबींकडेही काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.प्रकल्पस्थळी ओल्या कचऱ्यावर २८ दिवसांमध्ये बायोकल्चर फवारुन विंड्रोज तयार केले जातात व त्यानंतर विविध चाळण्यांमधून प्रक्रिया करुन सेंद्रिय खत तयार होते. हे सेंद्रिय खत उदयानांचे शहर अशी ओळख असणाऱ्या नवी मुंबई शहरातील २०० हून अधिक उदयाने फुलविण्यासाठी वापरले जाते. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील व्यक्ती व शेतकरी उदयानांकरिता तसेच शेतीकरिता हे खत खरेदी करुन वापरतात. या खताची दैनंदिन निर्मिती आणि वापर याचा तुलनात्मक अभ्यास करुन या खताचा जास्तीत जास्त वापर होईल याकडे लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
या प्रकल्पस्थळी प्लास्टिकवर प्रक्रिया केली जात असून प्लास्टिकपासून ग्रॅन्युल्स तयार केले जातात. व्यावसायिकांकडून पकडलेले प्रतिबंधात्मक प्लास्टिक व प्लास्टिकच्या पिशव्या प्रकल्पस्थळी आणल्या जाऊन त्यांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाते. नागरिकांनी एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णत: थांबवावा यासाठी अधिक प्रभावी जनजागृती करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.प्रकल्पस्थळी ६० घ.मी. क्षमतेचा लिचेट प्रक्रीया प्रकल्प असून त्यामधे लिचेटवर प्रक्रिया केली जाते. येथील प्रक्रियाकृत सांडपाण्याचा पुनर्वापर केला जात असल्याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
प्रकल्पस्थळी येणाऱ्या घनकचऱ्यावर डिओड्रन्ट स्प्रे केला जात असून नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची वाढती लोकसंख्या लक्षात घेता वाढीव क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे असून त्यादृष्टीने नियोजन करावे व नवीन क्षेपणभूमीकरिता जागेची मागणी करण्याबाबत तत्परतेने कार्यवाही करावी अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. याशिवाय ‘शून्य कचरा’ हे उद्दिष्ट प्रत्यक्षात साकारण्यासाठी कमीतकमी कचरा प्रकल्पस्थळी येणे गरजेचे असून त्यादृष्टीने कचरा संकलनाचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने परिमंडळनिहाय कचरा संकलन केंद्र सुरु करणेबाबत नियोजन करण्याचेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.