scorecardresearch

नेरुळच्या प्रयोगशाळेमुळे पालिकेची कोटय़वधींची बचत; ११ लाख ४० हजार आरटीपीसीआर चाचण्या

करोनाच्या पहिल्या लाटेत नवी मुंबई महापालिकेने नेरुळ येथील रुग्णालयात केवळ ११ दिवसांत उभारलेली प्रयोगशाळा नवी मुंबईकरांना लाभदायी ठरत आहे.

नवी मुंबई : करोनाच्या पहिल्या लाटेत नवी मुंबई महापालिकेने नेरुळ येथील रुग्णालयात केवळ ११ दिवसांत उभारलेली प्रयोगशाळा नवी मुंबईकरांना लाभदायी ठरत आहे. या प्रयोगशाळेत आतापर्यंत ११ लाख ४० हजार आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रति चाचणी साधारण २,२०० रुपये इतका खर्च येतो. या प्रयोगशाळेमुळे पालिकेला प्रति चाचणी ७५० रुपये खर्च आला. त्यामुळे पालिकेची प्रति चाचणी १४५० रुपये बचत झाली असून एकूण चाचण्यांच्या तुलनेत कोटय़वधी रुपये पालिकेची बचत झाली आहे.
सध्या ही प्रयोगशाळा करोना चाचण्यांसाठी वापरण्यात येत आहे. मात्र पुढील काळात या ठिकाणी इतर दुर्धर आजारांच्या चाचण्याही करण्यात येणार आहेत. त्यामुळे करोनाकाळातील ही प्रयोगशाळा नवी मुंबईकरांसाठी वरदान ठरत आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १३ मार्च २०२० रोजी करोनाचा पहिला रुग्ण तर १५ मार्च २०२० रोजी करोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर शहरात संसर्ग मोठया प्रमाणात वाढत गेला. मात्र शहरात प्रयोगशाळा नसल्याने नागिरकांचे नमुने घेऊन ते मुंबईतील जे जे तसेच कस्तुरबा रुग्णालयात पाठवले जात होते. या ठिकाणांहून चाचण्यांचे अहवाल येण्यास आठ आठ दिवस लागत होते. त्यामुळे बाधित रुग्ण इतरांना संसर्ग पोहोचवत असल्याने संसर्ग मोठय़ा प्रमाणात पसरत होता तसेच मृतदेह पाच ते सहा दिवस शयनगृहात ठेवावे लागत होते. त्यामुळे तत्काळ निदान व तत्काळ उपचारासाठी शहरात प्रयोगशाळेची गरज होती. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ११ दिवसांत ही प्रयोगशाळा नेरुळ येथील पालिकेच्या रुग्णालयात उभारली. ४ ऑगस्ट २०२० पासून ही प्रयोगशाळा नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. तेव्हापासून या ठिकाणी आतापर्यंत ११ लाख ४० हजार आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला दिवसाला एक हजार चाचण्यांची क्षमता हळूहळू वाढवत आता पाच हजारांपर्यंत दिवसाला या ठिकाणी चाचण्या करण्यात येत आहेत.
करोना चाचण्यांसाठी प्रति चाचणी २,२०० रुपये इतका खर्च पालिकेला येत होता. प्रयोगशाळा उभारल्याने यात मोठी बचत होत
हा खर्च ७५० रुपये इतका कमी झाला आहे. प्रयोगशाळेसाठी पालिकेने सहा कोटींचा खर्च केला आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या बचतीतून हा खर्च केव्हाच वसूल झाला असून कोटय़वधींची बचतही झाली आहे. आता ही प्रयोगशाळा पुढील काळात इतर दुर्धर आजारांच्या चाचण्यांसाठीही वापरण्यात येणार आहे. खर्चीक असणाऱ्या एच.आय.व्ही, कर्करोग यांसह संसर्गजन्य आजाराच्या चाचण्या या प्रयोगशाळेत मोफत करता येणार आहेत.
ही प्रयोगशाळा स्थानिक स्वराज्य संस्थेची अद्ययावत व एमएमआर क्षेत्रातील सर्वात मोठी आहे. करोनाच्या अतिशय कठीण परिस्थितीत प्रयोगशाळेचा अधिक व वेगवान चाचण्यांसाठी फायदा झाला. प्रतिमाणसी २,२०० रुपये खर्च येत असताना फक्त ७५० रुपये खर्च पालिकेला येत होता. करोनानंतरच्या काळात इतर दुर्धर आजारांच्या चाचण्या येथे मोफत करता येणार आहेत. ही पालिकेसाठी कायमस्वरूपी व मोठी आरोग्यसुविधा उपलब्ध झाली आहे. – अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Municipal corporation crores nerul laboratory 11 lakh 40 thousand rtpcr tests corona amy

ताज्या बातम्या