नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेच्या वतीने मोरबे धरणात सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याची निविदा प्रक्रिया सुरू असताना राज्यात सुरू झालेली वीज तुटवडा समस्या लक्षात घेता पालिका शहरातील मोठय़ा गृहनिर्माण संस्था तसेच बंगलेधारकांना जास्तीत जास्त सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी मालमत्ता करात २ ते ७ टक्के सवलत देण्याची घोषणा केली जाणार आहे. त्यासाठी सौर उर्जा अॅप तयार केला जाणार असून नागरिक या अॅपद्वारे त्यांच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची माहिती देऊ शकणार आहेत. मुंबई पालिकेनंतर नवी मुंबई पालिकेनेही मोरबे धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प जाहीर केला आहे. त्यासाठी देश-विदेशातील सौर ऊर्जा निर्मित कंपन्या सहभाग घेणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा कंत्राटानंतर टाटा समूहाने या सौर ऊर्जा प्रकल्पासाठीही रस दाखविला आहे. त्यामुळे या निविदेमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. जास्तीत जास्त कंपन्यांनी यात भाग घ्यावा यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. पालिकेच्या या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सार्वजनिक वापरातील विजेवर होणारा पालिकेचा ४० टक्के खर्च वाचणार आहे. राज्यात मोठय़ा प्रमाणात वीज तुटवडा आहे. त्यामुळे पालिकेने शहरात जास्तीत जास्त सौर ऊर्जानिर्मिती पॅनल लावावेत यासाठी नागरिकांना आवाहन केले जाणार आहे. विद्युत विजेच्या बाबतीत शहर स्वयंपूर्ण करण्याचा हा प्रयत्न असून काही मोठय़ा गृहनिर्माण संस्था व बंगलेधारक नागरिकांना छतावर सौर ऊर्जा प्रकल्प राबवावेत. असे प्रकल्प राबवल्यास त्यांच्या सार्वजनिक जागेत लागणारी वीज निर्माण त्यांना वकित घ्यावी लागणार नाही. विजेच्या बाबतीत शहर स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असून मोरबे धरणावर सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सौर ऊर्जानिर्मिती केंद्र उभारल्यास पालिका या नागरिकांना मालमत्ता करात २ ते ७ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यास तयार आहे. - अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका