नवी मुंबई : २४ जून रोजी होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची तयारी म्हणून बुधवारी आयोजित संवाद बैठकीत नवी मुंबई विमानतळाला स्व. दि बा पाटील यांचेच नाव असेल असा विश्वास व्यक्त करीत आंदोलनातील जोश संपऊ देऊ नका असे आवाहन प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी केले.
या बैठकीत प्रथमच आमदार गणेश नाईक यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. बैठकीत विमानतळ नामकरण आणि २९ गावांच्या जलस्थळ आणि जमिनीवरील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना गणेश नाईक यांनी, नामकरणाचा लढा हा जाळपोळ किंवा शासनाचे नुकसान होईल असे आंदोलन न करण्याचा सल्ला देत साखळी आंदोलनाचे त्यांनी कौतुक केले. हा प्रश्न राज्य शासनाशी तात्त्विक वाद घालत सोडवावा लागेल. विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव सुवर्ण अक्षरांनी लिहले जाईल. मात्र मी म्हणालो म्हणून नाव लागणार नाही तर आंदोलनाने हा हक्क प्राप्त करावा लागेल. त्यामुळे आंदोलनातील जोश संपू देऊ नका असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर तर गणेश नाईक सर्वात पुढे असतील असे आश्वासनही त्यानी दिले.
यावेळी समन्वयक अध्यक्ष दशरथ पाटील यांनीही कोणत्याही परिस्थितीत आंदोलन शांत होणार नाही असा विश्वास व्यक्त केला तर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्यातील अन्य कुठल्याही प्रकल्पाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या. मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा पाटील यांचेच नाव देण्याचा आग्रह बोलून दाखवला. बैठकीला २९ गावांतील गटनेते, महिला तसेच माजी खासदार संजीव नाईक, जेएनपीएचे विश्वस्त भूषण पाटील, डॉ राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आंदोलन शांततेतच
२४ जून रोजी स्व. दि.बा. पाटील यांच्या दहाव्या स्मृतिदिनाच्या दिवशी आंदोलन करण्यात आले असून ते शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे. या आंदोलनात प्रकल्पग्रस्तांच्या अन्य प्रलंबित मागण्याही केल्या जाणार आहेत, अशी माहिती संयोजक दशरथ भगत यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Name airport db patil project affected leaders insist agitation amy
First published on: 19-05-2022 at 00:09 IST