scorecardresearch

मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम

मोहिमेची दुसरी फेरी ऑक्टोबर २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

National Deworming Day campaign by Navi Mumbai Municipal Corporation
मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम

नवी मुंबई महापालिका शहरातील १ ते १९ या वयोगटातील मुला-मुलींनासाठी पुढील आठवड्यात सोमवारपासून सात दिवसांकरिता मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविणार आहे. सुदृढ आरोग्यासाठी जंतनाशक गोळी ही संजीवनी असून ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम’ वर्षातून दोनवेळा राबविण्यात येते. ही ‘ मोहीम यावर्षी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. १० ऑक्टोबर व मॉप अप दिन १७ ऑक्टोबर २०२२ यदरम्यान राबविण्यात येणार आहे. यामध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना वयोगटानुसार निश्चित केल्याप्रमाणे जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. ज्या शाळा सुरु आहेत त्या शाळांमध्ये हजर असणाऱ्या मुला-मुलींना शिक्षकांव्दारे तसेच अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींना अंगणवाडी शिक्षकांव्दारे जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.

हेही वाचा- रेल्वेने प्लॅटफॉर्म अचानक बदलल्याने प्रवाशांची उडाली धावपळ

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेमधील अंतर ६ महिन्यापेक्षा जास्त नसावे म्हणून मोहिमेची पहिली फेरी २५ एप्रिल २०२२ ते २ मे २०२२ दरम्यान राबविण्यात आली व दुसरी फेरी ऑक्टोबर २०२२ मध्ये आयोजित करण्यात येत आहे. या मोहिमेत शहरातील १ लाख ७९ हजार १९४ मुलांना या जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. मुलांच्या शरीरामध्ये जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियामित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे ही खबरदारी घेणेही आवश्यक आहे. ही मोहीम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा- नवी मुंबई, उरणमध्ये दिवसभर पावसाची दमदार हजेरी

बालकांचे कुपोषण रोखण्याचे उद्दिष्टे

१ ते १९ वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून परिसर स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे होतो. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण असून त्यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. याकरिता राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला – मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्यरक्षण, उत्तम पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्याचे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2022 at 13:03 IST