उरणमध्ये मैदान उपलब्ध नसल्याने दुखापतींशी सामना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरणमध्ये क्रीडांगणेच नसल्यामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांत प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडू व क्रीडा संस्थांना कोणत्याही अनधिकृत जागेत, गवतात, दगड मातीत किंवा रस्त्यावर सराव करावा लागत आहे. अपघात किंवा दुखापत होण्याची शक्यता आहे.

२०१५मध्ये उरण पनवेल रस्त्यावर खेळताना अपघात होऊन तीन खेळाडू गंभीर जखमी झाले होते. त्यातील एक राष्ट्रीय स्तरावरील धावपटू होता. त्याला या अपघातामुळे स्पर्धा गमवावी लागली होती. त्यनंतरही इथे खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. उरण तालुक्यातील १८ गावांची जमीन सिडकोने संपादित केली आहे. त्यामुळे येथील प्रत्येक गावाला, तालुक्याला क्रीडांगण देण्याची जबाबदारी सिडकोची आहे. उरण शहरात हीच जबाबदारी नगरपालिकेवर आहे. तरीही सर्व सुविधांनी युक्त असे एकही मैदान उरण तालुका आणि शहरात नाही. तरीसुद्धा उरणमधील नीलम कदम, भार्गव ठाकूर, प्रफुल्ल वशेणीकर, सुप्रिया पाटील, प्रशांत पाटील या खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्ये यश मिळवले आहे. तसेच मुंबई ठाणे या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धातही उरणच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. मात्र या खेळाडूंना रात्रीच्या अंधारात, दगडांत, गवतात धोका पत्करून सराव करावा लागत आहे.

भूखंड, निधी जैसे थे

उरण जिमखाना तसेच द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन हे दरवर्षी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करतात. त्यासाठी त्यांना शहराबाहेरील मोकळ्या जागांचा वापर करावा लागतो. या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करत उरण तालुक्याला मैदान देण्याची मागणी केल्याची माहिती द्रोणागिरी स्पोर्ट्सचे अध्यक्ष महादेव घरत यांनी दिली. त्यासाठी सिडकोने द्रोणागिरी नोडमधील सेक्टर ५० मध्ये पाच एकरचा भूखंड आरक्षित केला असल्याची माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी दिली, मात्र २०१४ पासून आरक्षित करण्यात आलेल्या या भूखंडावर काहीच काम झालेले नाही. या संदर्भात सिडकोने हा भूखंड विकसित करून द्यावा, अशी मागणी उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी केली आहे. उरण तालुका क्रीडांगणासाठी राज्याच्या क्रीडा विभागाकडून आलेला एक कोटीचा निधी तीन वर्षांपासून पडून आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National level players practice on the road
First published on: 03-12-2016 at 04:20 IST