पनवेल : नवी मुंबईमध्ये मागील वर्षी २८७ जणांचा अपघाती मृत्यू झाला. हे वर्ष सुरू झाल्यावर आतापर्यंत पाच महिन्यांत ३३१ अपघातांमध्ये १२७ जण मृत्यूमुखी पडले. अजूनही वर्ष सरण्यासाठी साडेसहा महिने शिल्लक असले तरी अपघातांची संख्या कमी होणे याकडे नवी मुंबईच्या वाहतूक पोलीसांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. नवी मुंबईतील अपघातांमध्ये उरण, न्हावाशेवा, पनवेल या ठिकाणी अपघातांमध्ये प्राण गमावल्यांची संख्या सर्वाधिक आहे.

नवी मुंबईतून पुणे, कोकणशी जोडलेल्या द्रुतगती आणि इतर राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्यासोबत विविध औद्योगिक वसाहती आणि जेएनपीए बंदरामुळे नवी मुंबईतील दळणवळणात झपाट्याने वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून सुरू होणाऱ्या वाहतुकीमुळे शहरातील विविध राष्ट्रीय महामार्ग आणि शहरांतर्गत वाहतुकीवर ताण वाढणार आहे. शहरातील वाहतुकीवर नियंत्रण असावे यासाठी १६ वेगवेगळे वाहतूक पोलीस ठाणी निर्माण केली. वाहतूक ठाण्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी या विभागाला स्वतंत्र पोलीस उपायुक्त नेमले आहेत. पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या नेतृत्वाखाली सरकारी रस्ते बांधणाऱ्या विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेतल्यामुळे नवी मुंबईतील ३० पैकी तीन अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) कायमची कमी झाल्याचा दावा उपायुक्त काकडे यांनी केला आहे.

सध्या उर्वरित २७ ब्लॅक स्पॉटवर तात्पुरते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरू असल्याचे उपायुक्त काकडे यांनी सांगितले. द्रुतगती महामार्गापासून ते पळस्पे आणि पळस्पे ते उरण, न्हावाशेवा या जेएनपीए महामार्गापर्यंत अपघाताचे मुख्य कारण रस्त्यावरील वाहने उभी केल्यामुळे अनेक अपघात झाल्याचे उघड झाल्यामुळे पोलिसांनी रस्त्याकडेला वाहने उभी करणाऱ्यावर सक्तीची कारवाई सुरू केली. या कारवाईतील सातत्यामुळे उरण परिसरात रस्त्याकडेला वाहने उभी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पोलिसांनी दिशादर्शक व सूचना फलक लावण्यावर भर दिला आहे.

रात्री नऊ वाजल्यानंतर स्वतंत्र पेट्रोलिंगसाठी पथक नेमले आहे. रस्त्याकडेला बेकायदा उभ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याने हे फिरते पथक त्यावर कारवाई करते. ज्या उड्डाणपुलाच्या दुभाजकावर वाहने धडकत होती अशा ठिकाणी ब्लिंकर व रिफ्लेक्टर बसविण्यात आली आहेत. जेथे रस्त्यावर रात्रीची विजेची सोय नव्हती तेथे पथदिवे बसवले आहेत.

१६ पोलीस ठाण्यांमध्ये २० गस्त दुचाकीसह पोलीस नेमले आहेत. या दुचाकीवरील पोलिसांकडे अपघातावेळी जखमींना मदतीसाठी रोप, कटर असे साहित्य देण्यात आले आहे. महामार्गात बंद पडलेल्या वाहने रस्त्याबाजूला करण्याचे काम हेच पथक करतात.

पामबीचवरील अपघातांची संख्या कमी

मद्यपी चालकांना रोखण्यासाठी दररोज वाहतूक नाकाबंदी लावल्यामुळे पामबीच मार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी झाल्याची माहिती उपायुक्त काकडे यांनी दिली. पोलिसांच्या माध्यमातून एक हजाराहून अधिक लहान मोठे प्रबोधनाचे कार्यक्रम झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघात कमी करणे हेच आमच्या विभागाचे उदिष्ट आहे. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघात होत असल्याचे समोर आल्याने उरण व परिसरातील रस्त्याकडेला एकही वाहन उभे केल्यास पोलिसांचे फिरते पथक सातत्याने कारवाई करत आहे. ब्लॅकस्पॉटवर दिर्घकालीन व तत्कालिन उपाययोजना केल्या आहेत. त्यावर देखरेख सुरू आहे. – तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक पोलीस विभाग