नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या सर्व ५७ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असली तरी पालिकेनेच माहिती घेतल्यानुसार शहरातील ४३० शाळांपैकी ३८३ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्याची लिंकद्वारे माहिती दिली आहे. तर काही शाळांनी अद्याप लिंकद्वारे माहिती दिलेली नाही. मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप व समतामूलक वातावरण निर्मितीसाठी २०२२ साली सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी शहरातील किती पालिका व खासगी शाळांमध्ये ही समिती आहे याबाबत साशंकता कायम आहे.

पालिकेच्या शिक्षण विभागाने सखी समिती गठीत करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत. त्या लिंकमध्ये जवळजवळ ४७ शाळांनी सीसीटीव्ही यंत्रणबाबतची माहिती पाठवलेली नाही. पालिकेने सीसीटीव्ही यंत्रणाबाबत व विविध समित्यांबाबत शाळांकडून गुरुवारी अहवाल लिंकद्वारे मागवला असून अद्याप पूर्णत: अहवाल प्राप्त झाला नाही. नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाने शहरातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना याबाबत पत्र दिले होते तसेच तक्रारपेटी व सखी सावित्री समितीबाबत तात्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा – उरण : जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा, भात पिकांवरील रोगाचा प्रतिबंध होण्यास मदत

काही शाळांमधील सीसीटीव्हीबाबत माहिती प्राप्त झाली नसल्याने याबाबतही पालिकेने योग्य ती खबरदारी घेणे अपेक्षित आहे. शाळास्तरावर सखी सावित्री समिती गठन करताना त्या समितीमध्ये १० सदस्य असून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेच या समितीचे अध्यक्ष असतात. शहरातील सखी सावित्री समितीबाबत व विशाखा समितीबाबतही शाळांची अद्यायावत माहिती मिळवून योग्य ती कार्यवाही करण्याची तयारी पालिकेने केली आहे. दरमहा सखी सावित्री समिती तसेच विशाखा समिती या समितीची बैठक आयोजित करण्याचे आवश्यक आहे. परंतु राज्य शासनस्तरावर सखी सावित्री समिती गठीत करण्याचे निर्देश दिलेले असताना किती शाळांमध्ये या समिती आहेत हा संशोधनाचा विषय असल्याचे चित्र आहे. कारण पालिकेने जमा केलेल्या माहितीत पहिल्याच दिवशी समिती गठीत केलेल्यांची संख्या कमी होती.

पालिकेच्या शाळांमध्ये शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा असूनही एका पालिकेच्या शाळेत भेट दिल्यानंतर शाळेत सीसीटीव्ही यंत्रणेबाबत अध्यापकांना विचारले असता शाळेत सीटीटीव्ही बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे शाळेतील सुरक्षेबाबत सर्वांनीच सजग राहण्याची गरज आहे. – सुधीर दाणी, सजग नागरिक मंच

हेही वाचा – नवी मुंबई : लसणाच्या दरात तेजी, घाऊक बाजारात प्रतिकिलो ४०० रुपयांवर

विद्यार्थी सुरक्षेबाबत सीसीटीव्ही यंत्रणा व विशाखा समिती व सखी सावित्री समितीची माहिती मागवली असून सर्व शाळांची माहिती प्राप्त केली जात असून त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. मुलांच्या सुरक्षेबाबत कोणताही हलगर्जीपणा तसेच निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. शहरातील सर्व शाळांची माहिती प्राप्त करण्यात येत आहे. – अरुणा यादव, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका