नवी मुंबई : आपला मित्र दुसऱ्या मुलीशी बोलत असल्याचे पाहताच त्याला याचा जाब विचारत एका युवतीने मित्रावर चाकू हल्ला केला. यात तिचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

अतिष शारुख असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास अतिष हा एका परिचित युवतीशी बोलत उभा होता. त्यावेळी त्याची मैत्रीण या ठिकाणी आली. आपला मित्र अन्य युवतीशी बोलत असल्याचा तिला राग आला. तिने थेट अतिष याला याचा जाब विचारला. अतिशला तिने शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. अतिषने अटकाव केल्याने एवढ्यावरच न थांबता तिने सोबत आणलेल्या चाकूने अतिषवर सपासप वार केले. यात त्याचा हात, चेहरा, कान, दोन्ही हात, हाताचे तळवे जखमी झाले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकूने वार करणारी युवती अल्पवयीन असल्याने तिला नोटीस देऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.