नवी मुंबई : शहरात थंडीची चाहूल लागताच हवेची गुणवत्ता पुन्हा खालावू लागली आहे. बुधवारी (४ नोव्हेंबर) नवी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ११६ वर पोहोचला. शहरातील महापे परिसरात सर्वाधिक १५७, तर कोपरखैरणे-वाशी परिसरात १४६ निर्देशांक नोंदविण्यात आला. शहरातील बांधकाम प्रकल्प, रस्त्यांवरील धूळ, वाढती वाहनसंख्या आणि औद्योगिक क्षेत्रांतील उत्सर्जन यामुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढले आहे. येथील निवासी भागांमध्ये रात्री आणि पहाटे उग्र रासायनिक वास येत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना धूलिकणांबरोबरच रासायनिक वायुप्रदूषणाचाही सामना करावा लागत असल्याने आरोग्याच्या समस्या बळावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बुधवारी नवी मुंबईतील आठपैकी सहा हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे कार्यरत होती. त्यापैकी महापे आणि कोपरखैरणे-वाशी येथील प्रदूषणाची पातळी शहराच्या सरासरीपेक्षा अधिक नोंदविण्यात आली. नेरूळ, सानपाडा आणि कळंबोली येथेही हवा मध्यम प्रदूषित श्रेणीत होती. तर तोंडरे-तळोजा येथे हवेची गुणवत्ता समाधानकारक असल्याची नोंद झाली. नोव्हेंबरच्या सुरुवातीला शहराचा निर्देशांक ७९ पर्यंत खाली आला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत तो ११६ वर पोहोचला. यापूर्वी २१ ऑक्टोबरलाही महापे आणि कोपरखैरणे-वाशी परिसरात प्रदूषणाची उच्च पातळी नोंदविण्यात आली होती. खारघर-तुर्भे जोडरस्त्यावरील बोगद्याचे काम, विविध पायाभूत सुविधा प्रकल्प, डेटा सेंटरची बांधकामे, रस्त्यांवरील धूळ आणि औद्योगिक क्षेत्रांतील उत्सर्जन हे प्रदूषण वाढण्यामागील संभाव्य स्रोत मानले जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ पसरते. शिवाय वाहनांचा धूर, वाहतूक कोंडी, औद्योगिक बॉयलर आणि डिझेल जनरेटर यांचाही हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. पावसाळ्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होणे आणि थंडीत वाऱ्याचा वेग मंदावणे यामुळे प्रदूषक हवेत साचण्याची शक्यता पर्यावरणवादींनी व्यक्त केली आहे.
रात्री, पहाटे उग्र रासायनिक वासाच्या तक्रारी
नवी मुंबईतील वाशी, कोपरखैरणे, बोनकोडे, घणसोली, रबाळे, नेरूळ आणि खारघर परिसरात रात्री उशिरा तसेच पहाटेच्या वेळी उग्र रासायनिक वास येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात असल्याचे पर्यावरणवादी कार्यकर्ते विनीलकुमार सिंह यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नवी मुंबई महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. औद्योगिक पट्ट्यातील काही कारखान्यांमधून होणारे उत्सर्जन हे कारण असू शकते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, या वासाचे नेमके रासायनिक घटक कोणते आणि त्याचा स्रोत कोणता, हे वैज्ञानिक तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकते. सिंह यांनी स्वतःच्या हवा गुणवत्ता मोजणाऱ्या उपकरणाद्वारे काही प्रदूषणाच्या घटनांची नोंद केल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः रात्री आणि पहाटेच्या वेळी औद्योगिक क्षेत्रांची अचानक तपासणी करून वायू उत्सर्जनावर लक्ष ठेवण्याची मागणी सिंह यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
पीएम १० धूलिकणांमुळे श्वसनविकारांचा धोका
हवेतील सूक्ष्म धूलिकण (पीएम १०) हे श्वासावाटे शरीरात प्रवेश करून श्वसनमार्गातून फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे खोकला, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास आणि दम्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते. दीर्घकाळ अशा प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्यास फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक धोका असतो. दुसरीकडे, काही रासायनिक वायूंच्या संपर्कामुळे डोळे, नाक आणि घशाची जळजळ, डोकेदुखी तसेच श्वसनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रासायनिक वासाच्या तक्रारींकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. या संबंधी अधिक माहितीसाठी महापालिका आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. राजेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. वाढते हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे आश्वासन दिले असून, फॉगर यंत्रणाही कार्यरत केल्याचे दावे केले आहेत.
प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची प्रतीक्षा
महापे येथे सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली असून, विशेष म्हणजे याच परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय आहे. महापे आणि परिसरातील औद्योगिक घटकांची तपासणी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई झाली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. यासंदर्भात मंडळाचे प्रादेशिक अधिकारी सचिन अडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
कोपरी, वाशी भागात रात्रीचे धुरके
खैरणे अैाद्योगिक पट्टयालगत असलेल्या कोपरी तसेच वाशी या उपनगरांमध्ये रात्रीच्या वेळेत धुरके पसरत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावरुन कोपरी उड्डाणपूलावर प्रवेश करताच हे धुरके अधिक गडद होते आणि उग्र वासही प्रवाशांना जाणवतो. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हे दुरके वाशीतील वेगवेगळ्या भागातही पसरत असल्याच्या तक्रारी आहेत. यासंबंधी महापालिका अथवा प्रदुषण नियंत्रण करणाऱ्या संस्थांकडून कोणतीही ठोस माहिती रहिवाशांना दिली जात नसल्याचे चित्र आहे. यासंबंधी अधिकृत प्रतिक्रिया देखील या संस्थांकडून उपलब्ध होत नव्हती.
