नवी मुंबई : नवी मुंबई हे शांत शहर म्हणून सुप्रसिद्ध असले तरी येथील ऐरोली नोड मध्ये अनेक भयानक गुन्हे घडले आहेत. मात्र गेल्या दशकभर शांत असणाऱ्या ऐरोलीत रात्री साडे बाराच्या सुमारास एका युवकावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली असून सीसीटीव्हीफुटेजच्या अनुशंघाने पथके रवाना केले आहेत. स्वतः उपयुक्त पंकज दहाने हे पूर्ण प्रकरण हाताळत आहेत.
ऐरोली सेक्टर १ येथील साईनाथ वाडी परिसरात हा थरारक हल्ला झाला. रात्री साडे बाराच्या सुमारास अमित मौर्य हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्या गाडीतून ते स्वतः आणि संदीप गवस हे कुठेतरी जात असताना दुचाकीवर काही युवक आला आणि त्यांनी गोळीबार केला. त्यात त्यांच्या वाहनांच्या समोरील काचेतून गोळी आत जाऊन मौर्य यांच्या मानेला लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मुलुंड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पहाटे जेव्हा ते बोलण्याच्या मनस्थितीत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधला असता नेमक्या कोणी कशासाठी हा हल्ला केला हे माहिती नाही तसेच कोणावर संशय नाही असे मौर्य यांनी सांगितले अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटने नंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक हि सोबत घेण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार दुचाकीवर दोन युवक आले होते त्यांनी हेल्मेट घातले होते. मौर्य यांच्या गाडी जवळ येताच त्यांनी बंदूक काढून गोळ्या झाडत निघून गेले. हल्लेखोरांनी नेमक्या किती गोळ्या झाडल्या याचाही तपास सुरु आहे. तसेच घाईत पळून जाताना काही बंदुकीच्या गोळ्या खाली पडल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित मौर्य याच्या गाडीवर शिवसेनेचे स्टिकर दिसून आले. याबाबत शिवसेना विरोधी पक्ष नेता विजय चौगुले यांना विचारणा केली असता त्यांनी नकार दिला. याबाबत परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाने यांना विचारणा केली असता त्यांनी अशी घटना घडली याला दुजोरा दिला आहे. रात्री मंगळवारी साडे बाराच्या सुमारास ऐरोली येथील साईनाथ वाडी येथे हा प्रकार घडला आहे. यातील जखमी अमित मौर्य याच्यावर उपचार सुरु आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोराच्या शोधासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.आरोपी पोलिसांच्या रडार वर आले आहेत. असेही पोलीस उपायुक्त डहाणे यांनी सांगितले.
