नवी मुंबई : ऐरोलीतील खेडकर चौकात टेम्पो चालवत असताना चालकाला अचानक फिट आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून टेम्पो दुभाजकावर आदळल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. अपघातानंतर चालक बेशुद्ध पडल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रबाळे वाहतूक शाखेच्या दोन पोलिसांनी प्रसंगावधान राखत तातडीने चालकाला रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. त्यांच्या या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुज लालजी कौशल हा टेम्पो चालक शुक्रवारी दुपारी वाशी येथील एपीएमसी बाजारातून माल भरून कांदिवलीच्या दिशेने निघाला होता. त्याच्यासोबत राज शैलेंद्र कौशल हा सहप्रवासी होता. दुपारच्या सुमारास टेम्पो ऐरोलीतील खेडकर चौकात पोहोचला असता, अनुज कौशल याला अचानक तीव्र फिट आली. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट रस्त्यावरील दुभाजकावर आदळला.
अपघातानंतर चालक टेम्पोमध्येच बेशुद्ध अवस्थेत पडून राहिला. भर चौकात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अपघात पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याचवेळी कर्तव्यावर असलेल्या रबाळे वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे आणि हेड कॉन्स्टेबल सिद्धेश्वर माळी यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोन्ही पोलिसांनी परिस्थितीचा वेगाने आढावा घेतला. चालकाची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याला वाहनातून बाहेर काढून प्राथमिक मदत केली. त्यानंतर कोणताही विलंब न करता जवळच्या रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर अपघातग्रस्त टेम्पो रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे चौकातील वाहतूक काही वेळातच पूर्ववत झाली.
वेळेत उपचार मिळाल्यामुळे चालक अनुज कौशल याची प्रकृती स्थिर झाली असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती रबाळे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बडगुजर यांनी दिली. चालकाला अचानक फिट आल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाण्याची भूमिका वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. संतोष शिंदे आणि सिद्धेश्वर माळी यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे चालकाचे प्राण वाचलेच, शिवाय भर चौकात आणखी एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यताही टळली. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
