पनवेल – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ८ जुलै रोजी पनवेल ते मुंबईतील विधानभवन असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात १० हजार दि. बा. पाटील समर्थक सहभागी होतील, अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरू होऊन सहा महिने पूर्ण झाले असून १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. मात्र, विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. त्यानंतरही नावाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसल्याने प्रकल्पग्रस्त आणि महाविकास आघाडीतील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
केंद्रीय मंत्र्यांनी तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची भूमिका घेतली असल्याचे वारंवार सांगितले जात असताना अद्याप घोषणा का करण्यात आली नाही, तसेच विमानतळाच्या प्रवेशद्वारावर दि. बा. पाटील यांचा पुतळाही का उभारण्यात आला नाही, असे अनेक प्रश्न प्रकल्पग्रस्तांकडून उपस्थित केले जात आहेत. विमानतळाला दि. बां.च्याच नावाचा एकमुखी ठराव केंद्र सरकारकडे पाठविल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात याबाबत देशाचे पंतप्रधान का निर्णय घेत नाही यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी वाढली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून या मागणीसाठी आंदोलनाला पुन्हा वेग आला आहे. पनवेलच्या रश्मिता पोपेटा यांनी उपोषण सुरू करून आंदोलनाची सुरुवात केली. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असले तरी त्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध गावांमध्ये बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, शिवसेना पदाधिकारी मनोहर भोईर तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
