पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारून प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले. मात्र, मुसळधार पाऊस आणि पोलिसांची कारवाई यानंतरही प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन मागे न घेता पायी मोर्चाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार कायम ठेवला. अनेक आंदोलक सानपाड्यातील शिवमंदिरापर्यंत पायी तर अनेकजण वाहनाने पोहोचले, तर काही आंदोलक कळंबोली येथील पोलीस मुख्यालयाबाहेर एकत्र जमले. मात्र या मंदीरात आंदोलक आल्यावर त्यांना हे आंदोलन कळंबोलीपर्यंत स्थगित केल्याचे सांगण्यात आले. 

बुधवारी सकाळी पनवेल शहरातून आंदोलनाला सुरुवात होताच पनवेल शहर पोलिसांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे रस्त्यांवर आंदोलकांची संख्या तुलनेने कमी दिसत होती. तरीही सामान्य प्रकल्पग्रस्त आणि तरुण कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू ठेवत पायी प्रवास करण्याचा निर्णय कायम ठेवला.

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात पनवेल शहरातून सानपाडा येथील पनवेल-शीव महामार्गावरील शिवमंदिरापर्यंत पायी पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले होते. शेकडो आंदोलकांनी छत्र्या घेऊन मुसळधार पावसात पायी चालत आंदोलनात सहभाग नोंदविला. प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलन थांबले नाही.

या आंदोलनात शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांचे पुत्र आदित्य पाटील यांच्यासह शिवम पाटील, कुणाल भेंडे, रोहन पाटील, किझार कच्छी, हर्ष म्हात्रे आणि अन्य तरुण कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आंदोलनाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.प्रकल्पग्रस्तांनी पोलिसांच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत, हा संघर्ष पोलिसांविरोधात नसून राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात असल्याचे स्पष्ट केले. दि. बा. पाटील यांना न्याय मिळावा आणि विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, हीच आंदोलनाची प्रमुख मागणी असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

आंदोलनात महिलांचा सहभागही लक्षणीय होता. अनेक महिला आंदोलकांनी टाळ वाजवत ‘ज्ञानबा-तुकाराम’चा गजर करून आंदोलनात सहभाग नोंदविला. वृद्ध महिलांनीही पावसाची पर्वा न करता आंदोलनात सहभाग घेतला. नेत्यांना ताब्यात घेतल्यामुळे आंदोलकांचे दोन गट पाडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला तरी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कायम असल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.सानपाडा येथील शिवमंदीराचे प्रवेशव्दार सुरूवातीला बंद ठेवण्यात आले.

या मंदीराच्या प्रवेशव्दारावर सुरूवातीला आलेल्या काही प्रकल्पग्रस्तांनी मागणी करूनही मंदीराचे प्रवेशव्दार उघडले नाही, मात्र नंतर आंदोलकांची संख्या वाढल्याने मंदीराचे प्रवेशव्दार उघडून आंदोलक तेथे जमले.आंदोलकांना परवानी नाकारण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये आंदोलक ज्या महामार्गावरून जाणार होते त्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्यांना त्रास झाला असता. अतिवृष्टी आणि आधिवेशन सुरू असल्याने परवानगी नाकारली होती. सकाळी ज्यावेळेस आंदोलन सुरू झाले त्यावेळेस त्यांना ताब्यात घेऊन दुपारी सोडण्यात देखील आले. – रश्मी नांदेडकर, उपायुक्त, परिमंडळ ३, नवी मुंबई पोलीस