Navi Mumbai Airport Naming Case: नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. नवी मुंबईतील दिबां प्रेमी ऍड. विकास पाटील यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
यावेळी न्यायालयाने नामकरणाचा अधिकार केंद्र व राज्य सरकारचा असल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे पुन्हा स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमीपुत्रांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र व राज्य सरकार वारंवार नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव देणार असल्याचा पुनरुचार करीत असली तरी या संदर्भात निर्णय घेतला जात नाही. नवी मुंबई विमानतळ हे कार्यान्वित होऊन ऑक्टोबर पासून आठ महिने झाले असून वाहतुकीचा वेगही वाढला आहे. तर या विमानतळावरून लवकरच आंतराष्ट्रीय विमान सेवा ही सुरू होणार आहे. असे असले तरी या विमानतळाचा नामकरणाचा तिढा मात्र कायम आहे.
नवी मुंबईसह देशभरातील शेतकऱ्यांना संघर्षातून त्यांचा हक्क मिळवून देणारे रायगडचे माजी खासदार दि. बा. यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या नामकरणाच्या मागणीसाठी पाच वर्षे लढा सुरू आहे. मात्र त्याचा निर्णय होत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने तातडीने दिबांच्या नावाचे आश्वासन न दिल्यास तीव्र आंदोलन पुकारले जाईल अशी भूमिका यापूर्वी आगरी समाजाचे नेते व सर्वपक्षीय नवी मुंबई विमानतळ नाकारण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी घेतली होती.
त्यानंतर सर्वपक्षीय नामकरण समितीने दिल्लीत केंद्रीय नागरी विमानन मंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी पुन्हा एकदा केंद्राने दिबांच्या नावाचे आश्वासन दिले होते. तसेच यासाठी एकमेव दिबांच्याच नावाचा प्रस्ताव असल्याचेही स्पष्ट केले होते. तत्कालीन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही अशा प्रकारचे आश्वासन दिले होते. मात्र एप्रिल २०२५ पासून नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार असून अजून पर्यंत दिबांच्या नावाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नसल्याने नामांतरणाचा निर्णय केव्हा होणार असा प्रश्न आता भूमिपुत्रांना पडला आहे.
भूमिपुत्रांच्या संघर्षामुळे दिबांच्या नवी मुंबई विमानतळ नामकरण लढ्याची दखल घेत केंद्र सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. लवकरच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर केले जाईल अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिली होती. नवी मुंबई विमानतळावर अनेक चाचण्या सुरू झाल्याने घटिका सामीप येताच पुन्हा एकद दिबांच्या नामकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या संदर्भात सर्व पक्षीय नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते आजारी असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. नामकरणाचा प्रश्न हा न्यायालयाचा नसल्याने याचिका दाखल करु नये असे याचिकाकर्ते ऍड विकास पाटील यांना आपण सांगितले होते. यापूर्वी त्यांची या संदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या याचिकेशी आणि नामकरण आंदोलन याच्याशी काही संबंध नसून राज्य सरकारने आपला प्रस्ताव केंद्रा कडे पाठविला आहे. आणि तो केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लवकरच पारित होऊन नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव लागेलं असे आशावादी मत दिबांचे चिरंजीव अतुल दीबा पाटील यांनी व्यक्त केले आहे.
