उरण : मागील पाच वर्षांपासून नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्रांचे आंदोलन सुरू आहे. मात्र आश्वासना शिवाय काही मिळालं नाही. त्यामुळे बुधवारी भूमिपुत्रांनी थेट दिल्लीत जंतर मंतर येथे जाऊन या मागणीसाठी आवाज बुलंद करीत निदर्शने केली. यासाठी बसने रेल्वेने आणि विमानाने मुंबई, रायगड,नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथील शेकडो भूमिपुत्र पोहचले होते. यासाठी जासई ते दिल्ली अशी दिंडी यात्रा काढण्यात आली होती. दिबांची वारी दिल्लीच्या दारी या नावाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. यात भूमिपुत्र महिलांचा मोठा सामावेश आहे.

महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई विमाताळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देणारा ठराव केंद्रीय मंत्री मंडळाकडे पाठविला आहे. तर नुकताच या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये असंतोष पसरला आहे. २४ जून या दि. बा. पाटील यांच्या जन्मदिनी चिंचपाडा येथे उपोषण करण्यात आले तर ८ जुलैला पनवेल ते मंत्रालय असा पायी मोर्चा ही काढण्यात आला होता. मात्र या मोर्चेकरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही राज्य सरकार कडून केवळ आश्वासनच देण्यात आले होते. त्यानंतर भूमिपुत्रांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

भूमिपुत्रांमध्ये प्रचंड असंतोष असतांनाच केंद्र सरकारने नामकरणाचा प्रश्न प्रलंबित असतांना नवी मुंबई विमातळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू केली आहे. राज्य सरकारने दि. बा. पाटील यांच्या नावाचा ठराव करून तो केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. याचा अंतिम निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच घेतील असे स्पष्ट मत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिबांच्या नावाच्या मागणीसाठी चिंचपाडा पुलाखाली उपोषण करणाऱ्या रश्मीता पोपेटा यांच्या आंदोलनाच्या भेटीवेळी व्यक्त केले होते. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडे नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा राज्य सरकारचा एकमेव प्रस्ताव असल्याने सरकार कडून वारंवार स्पष्ट केले जात आहे. परंतु या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पर्यंत मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे रायगड,ठाणे,मुंबई, नवी मुंबई आणि पालघर या स्थानिक भूमीपुत्रांच्या पाचही किनारी जिल्ह्यातील स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरणाला आता सत्ताधारी महायुती विरोधात महाविकास आघाडी असा रंग आला होता. त्यामुळे भूमिपुत्रांच्या अस्मिता आणि अस्मितेच्या या प्रश्नांवर पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. यासाठी २ ऑगस्टला दिबांच्या जासई या जन्मगावा पासून दिंडी यात्रा काढण्यात आली होती.