उरण : नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्याने आता भूमिपुत्रांनी नामकरणासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबईला जोडणारा अटलसेतू रोखणार असल्याची माहिती सर्वपक्षीय दि. बा. पाटील नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली. त्यामुळे नामकरण आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी याच प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात समितीच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण सुरू होऊनही नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रश्न सुटलेला नाही. मुख्यमंत्री आणि केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री यांनीही वारंवार या संदर्भात आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यातूनच पुन्हा एकदा नामकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी विमानतळ नामकरणासाठी खासदारांकडून संसदेसमोर आंदोलन करण्यात आले आहे. तर सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री नामकरणासंदर्भात लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते. तर याच मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
भूमिपुत्र संभ्रमात

  • नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र त्यासाठी उशीर लागत असल्याने स्थानिक भूमिपुत्रांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
  • सध्या मुंबई, नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील विमानतळाकडे येणाऱ्या मार्गांवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवर केवळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव लिहण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विमानतळाच्या मुख्य मार्गावरही अशाच प्रकारे उल्लेख असलेले फलक आहेत. त्यामुळे भूमिपुत्र संभ्रमात आहे.
  • याविरोधात स्थानिक भूमिपुत्र तरुणांनी काही ठिकाणी हे फलक उखडवून लावून नाराजीही व्यक्त केली गेली. तर समाजमाध्यमातून याविषयी रोष व्यक्त करीत फलक पुसण्याची भाषा सुरू झाली आहे. यातून भूमिपुत्र संताप व्यक्त करीत आहेत.
    नामकरणाच्या घोषणेपर्यंत लढा सुरूच

नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी सुरू करण्यात आलेला लढा हा जोपर्यंत केंद्र सरकार दिबांच्या नावाची अधिसूचना प्रसिद्ध करीत नाही तोपर्यंत संपलेला नाही. त्यासाठी सागरी किनारपट्टीवरील भूमिपुत्र आणि राज्यातील भूमिपुत्र मिळून मुंबईला जोडणारा अटलसेतू रोखणार असल्याची माहिती सर्वपक्षीय दि. बा. पाटील नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी नेत्यांच्या भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली आहे.