विमानतळासाठी उंची कमी करणार; वरचा ओवळा येथील ग्रामस्थांचा विरोध
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची नवी मुंबई विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लागणारी परवानगी मिळाल्याने सिडकोने चार कंत्राटदारांना विमानतळपूर्व कामांचे कार्यादेश दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवडय़ात उलवा टेकडीची उंची कमी करण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे, मात्र या टेकडीच्या मागील बाजूस असलेल्या वरचा ओवळा ग्रामस्थांचा याला विरोध आहे. दोन दिवसांपूर्वी सर्वेक्षणाला गेलेल्या सिडको अभियंत्यांना या ग्रामस्थांनी घेराव घातला होता.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नोव्हेंबर २०१२ मध्ये नवी मुंबई विमानतळाला पहिली परवानगी दिली. त्या वेळी पर्यावरण मंत्रालयाने विमानतळ आराखडय़ात काही सुधारणा करण्यास सिडकोला सांगितले होते. त्यानुसार तयार करण्यात सुधारित आराखडय़ास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची दुसरी परवानगी आवश्यक होती. ती १९ एप्रिल रोजी मिळाली. त्यामुळे सिडको विमानतळाच्या गाभा क्षेत्रातील सपाटीकरण, उलवा टेकडी कपात आणि गाढी नदीचा प्रवाह बदलणे यांसारखी दोन हजार कोटी रुपये खर्चाची कामे काही महिन्यांपूर्वीच जीव्हीके, गायत्री, जे. एम. म्हात्रे आणि ठाकूर इन्फ्रा या चार बांधकाम कंपन्यांना देण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पर्यावरण परवानगीमुळे ही कामे कंत्राटदारांनी करता येत नव्हती. त्याला १० गावांपैकी दोन गावांतील ग्रामस्थांचा विरोध आजही कायम आहे. केंद्रीय पर्यावरण परवानगी मिळाल्याने सिडकोने या कंत्राटदारांना शुक्रवारी काम करण्याचे आदेश दिले.
काम मिळाल्यानंतर चार कंत्राटदारांनी कामाच्या स्वरूपाचे सर्वेक्षण केले होते. त्यामुळे पुढील आठवडय़ात उलवा टेकडीची उंची कमी करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. ९५ मीटर उंच असलेली ही टेकडी कापली जाणार असून त्यातून साडेतीन कोटी टन माती निघणार आहे. ती विमानतळ गाभा क्षेत्रात सपाटीकरणासाठी वापरली जाणार आहे. जम्मू-काश्मीरमधील रेल्वेचे काम करताना खोदण्यात आलेल्या बोगद्यावर देखरेख ठेवणाऱ्या सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मायनिंग आणि फ्युएल रिसर्च (सीआयएमएफआर) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ही टेकडी कापण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
या प्रमुख कामाबरोबरच धावपट्टीच्या आड येणाऱ्या ३२०० मीटर लांबीच्या गाढी नदीचे पात्र मोहा खाडी पुलाच्या दिशेने वळविले जाणार आहे. त्यासाठी गार्बियन भिंत उभारली जाणार आहे. मान्सूनपूर्वी या कामांची सुरुवात केली जाणार आहे. या प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या १० गावांपैकी दोन गावांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. वरचा ओवळा आणि कोल्हीतील ग्रामस्थांनी सर्वेक्षण करण्यास जाणाऱ्या कंत्राटदारांच्या कर्मचारी व सिडको अधिकाऱ्यांना यापूर्वी घेराव घातला आहे. वरच्या ओवळ्याला या टेकडी कपातीच्या कामाचा सर्वाधिक त्रास होणारा आहे.
पर्यावरणाचा प्रश्न
विमानतळाच्या टेक ऑफ आणि लॅण्डिंगला अडथळा ठरू पाहणारी उलवा येथील ९५ मीटर उंच टेकडी नामशेष होणार आहे. विविध उपाययोजना करून या टेकडीची कपात केली जाणार आहे, मात्र आजूबाजूच्या गावांना या कामाचा आणि पर्यायाने निर्माण होणाऱ्या धुलीकणांमुळे आणि आवाजामुळे प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे.
सिडकोने अनेक प्रश्न सोडवले आहेत. आता केवळ दोनच प्रश्न शिल्लक आहेत. आठ गावांना एक न्याय आणि दोन गावांना वेगळा न्याय हे योग्य नाही. साडेबावीस टक्के योजनेत प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या गरजेपोटीच्या घरांची तीन पट कपात केली जात आहे. ती अयोग्य आहे. आठ गावांची पात्रता पूर्ण झालेल्या आहेत. वरचा ओवळा आणि कोल्ही गावातील ग्रामस्थांच्या देय भूखंडातून ही कपात केली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा संघर्ष कायम राहील. स्थलांतरासाठी मुदतवाढ देणे आवश्यक आहे.
– महेंद्र पाटील, अध्यक्ष, नवी मुंबई विमानतळ संघर्ष समिती.
नवी मुंबई विमानतळाचे काम वेळेत सुरू व्हावे यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळाल्यानंतर लगेच कामाचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे सीआयएमएफआर या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली टेकडी कपातीच्या कामाला पुढील आठवडय़ात सुरुवात केली जाणार आहे.
– संजय चौधरी, मुख्य अभियंता (विमानतळ) सिडको
