नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी एकेकाळी महाविकास आघाडी सरकारविरोधात ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आगरी, कोळी समाजाची मोट बांधत आंदोलन पुकारणाऱ्या भाजपने बुधवारी मात्र याच मागणीसाठी एकत्र येऊ पाहणाऱ्या आंदोलकांना पोलीस कारवाईने रोखल्याचे चित्र पाहायला मिळाले. विधानसभेचे अधिवेशन सुरु असल्यामुळे पनवेल ते मंत्रालय असा पद मोर्चा काढायच्या तयारीत असलेल्या आंदोलकांची सकाळपासूनच धरपकड करण्यात आली.

या नामांतरासाठी उपोषणाला बसलेल्या एका तरुणीस रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मोठ्या पोलीस बंदोबस्तात आक्रमक प्रशासकीय हालचालींमुळे उभे राहू पाहत असलेले हे आंदोलन वेळीच रोखण्यात सत्ताधारांना यश आल्याची चर्चा आता रंगली आहे.
बुधवारी पनवेल शहरातून सानपाड्याच्या दिशेने निघालेल्या पायी मोर्चाला नवी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. कायदा व सुव्यवस्था तसेच महामार्गावरील वाहतूक कोंडी, अतिवृष्टी अशी कारणे त्यासाठी पुढे करण्यात आली. सकाळी आंदोलन सुरु होताच, प्रमुख नेत्यांसह अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

या उपोषणा सहभागी झालेल्या रश्मीका पोपेटा या महिला आंदोलकालाही ताब्यात घेण्यात आले. यावेळी काही महिला आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापत तसेच शाब्दीक वाद झाला. या आंदोलनासाठी ठाणे, रायगड जिल्ह्यातील आगरी, कोळी समाजातील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेले नेते नरमल्याने या तरुण आंदोलकांचा हिरमोड झाला. दरम्यान, दि.बा. पाटील यांच्या नावासाठी आंदोलन करणाऱ्या भाजपने आता पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन चिरडल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

भाजप नेते आंदोलनापासून दूरच

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, या नामांतराच्या आंदोलनाला ठाणे, रायगड जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी बळ दिले होते. भाजपचे पनवेल, उरणचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी या दोघांच्या पुढाकाराने या आंदोलनाचा विस्तार करण्यात आला होता. गणेश नाईक, रामशेठ ठाकूर, कपिल पाटील, मंदा म्हात्रे यासारख्या भाजप नेत्यांनी या आंदोलनाला बळ दिले होते. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमानतळाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे असा अट्टहास धरला आणि त्यातूनच हे आंदोलन पुढे उभे राहिले.

दरम्यान, सत्तांतर झाल्यानंतर विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असला, तरी अद्याप त्यास मंजूरी नाही. त्यामुळे या नामांतरासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आगरी, कोळी भूमिपूत्रांकडून वरचे वर आंदोलन सुरु असतात. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून पनवेल येथील शिवाजी चौकातून मंत्रालयापर्यंत पदयात्रेचे आंदोलन बुधवारी आखण्यात आले होते. या आंदोलनास महाविकास आघाडीतील नेत्यांची हाक होती. मात्र, सकाळपासून तैनात करण्यात आलेल्या मोठ्या पोलीस बंदोबस्ताद्वारे हे आंदोलन उभेच राहणार नाही, याची पूरेपूर काळजी बुधवारी दिवसभर घेण्यात आली.

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलनावर टीका करत, दि. बा. पाटील यांच्या नावासाठी भाजपची भूमिका पूर्वीप्रमाणेच कायम असल्याचा दावा केला. पोलिसांकरवी आंदोलन दडपण्याच्या आरोपांचा त्यांनी इन्कार केला. विरोधकांनी अनेक दिवस आवाहन करूनही आंदोलनाला प्रकल्पग्रस्तांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी म्हटले. राज्य सरकारने विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठविण्यामागे भाजपच्या आंदोलनाचीच भूमिका असल्याचा दावाही त्यांनी केला.

याबाबत नवी मुंबई पोलीस परिमंडळ ३ च्या उपायुक्त रश्मी नांदेडकर यांनी सांगितले की, महामार्गावरील वाहतूक कोंडी, अतिवृष्टी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती. सकाळी आंदोलकांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेऊन दुपारनंतर त्यांची मुक्तता करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.