पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या पनवेल आणि उरण परिसरातील प्रमुख मार्गांवरील उड्डाणपूल व सेवारस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पळस्पे फाटा ते जेएनपीटी महामार्ग तसेच उरणकडून विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्री परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.

पळस्पे ते जेएनपीटी मार्गावरील टी-पॉईंट येथील उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे काही दिवसांपूर्वी एकामागोमाग आठ ते दहा वाहनांचे टायर फुटले. पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनचालक आणि प्रवाशांना मदत केली. अशा घटना या मार्गावर वारंवार घडत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

रस्त्यावर खड्डे पडल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) माहिती दिली जाते. त्यानंतर प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून खड्डे बुजविले जातात. मात्र ही दुरुस्ती अनेकदा तात्पुरती ठरत असून काही ठिकाणी खड्डे अद्याप कायम आहेत. उरणकडून नवी मुंबई विमानतळाकडे जाणारी मार्गिका सुमारे चार वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी खुली झाली. या मार्गावरील वहाळ उड्डाणपुलाची दयनीय अवस्था आहे.

पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यातून ४० ते ५० मेट्रिक टन वजनाचे अवजड वाहन गेल्यानंतर रस्त्याचे नुकसान होऊन खड्डे वाढतात. रस्त्याला वळण असलेल्या ठिकाणी अवजड वाहनांच्या चाकांच्या घर्षणामुळेही रस्ता खराब होत आहे. रात्री खड्डे दिसत नसल्याने पथदिवे आणि ब्लिंकर दिव्यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.

जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वजन घेऊन अवजड वाहने धावत असल्याची तक्रार आहे. अशा वाहनांवर आरटीओकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने रस्त्यांवर अतिरिक्त भार पडत असल्याचे सांगण्यात येते. प्रत्येक अपघातानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी अपघातस्थळाची पाहणी करून रस्त्यांमधील दोषांचा अहवाल देणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्ष अपघातस्थळाची पाहणी करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.

रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा

पनवेल शहर वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी टी पॉईंट उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे आठ ते दहा वाहनांचे टायर फुटले. पोलिसांनी वाहनचालकांना मदत केली. खड्ड्यांची माहिती आम्ही तातडीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देतो. त्यांच्याकडून खड्डे तात्पुरते बुजविले जातात. मात्र ‘रोड फर्निचर’ व्यवस्थित ठेवणे, रस्त्यांतील दोष दूर करणे आणि पथदिवे सुरू ठेवण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करीत आहोत. गेल्या वर्षी या रस्त्यावर अपघातांत सात जणांचा मृत्यू झाला होता. यंदा आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.​