पनवेल : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या मुंबई आणि उपनगरांतील प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) २०० हून अधिक ‘लालपरी’ बसगाड्यांचा नवी मुंबई विमानतळालगतच्या रस्त्यावर तात्पुरता थांबा करण्यात आला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, पूणे अशा विविध जिल्ह्यातील विविध आगारांतून या बसगाड्या गुरुवारी रात्री पनवेलमध्ये दाखल झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून त्यांना टप्प्याटप्प्याने कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आले. मात्र, बसगाड्या उभ्या करण्यासाठी आणि चालकांच्या विश्रांतीसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने चालकांना रात्री बसमध्येच मुक्काम करावा लागला.
गणेशोत्सवासाठी मुंबईतील कोकणवासीयांनी या बसगाड्यांचे आरक्षण केले आहे. मुंबईतील परळ आगारातून या बसगाड्यांचे आरक्षण अनेक महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते. मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरातील प्रवाशांसाठी विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही बसगाड्यांचे आरक्षण केले आहे.राज्यातील विविध आगारांतून बसगाड्या पनवेलमध्ये आणण्यात आल्या. पनवेलमध्ये इंधन भरल्यानंतर शुक्रवारी दुपारपासून बसगाड्या कोकणाकडे रवाना करण्यात आल्या. मात्र, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असली तरी एसटी बसगाड्यांसाठी मोठे वाहनतळ तसेच चालकांच्या विश्रांतीसाठी स्वतंत्र व्यवस्था अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे विमानतळालगतच्या उलवे ते करंजाडे मार्गावर बसगाड्या उभ्या करून चालकांना त्याच बसमध्ये झोपावे लागले.
चालकांना व्यवस्थित विश्रांती घेता यावी यासाठी एसटी महामंडळाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली नव्हती. चालकांसाठी स्वच्छतागृहांची संख्याही अपुरी होती. त्यांना सीलबंद पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी सकाळचा नाश्ता मिळाला नसल्याची तक्रार चालकांनी केली. विमानतळालगतच्या रस्त्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत हॉटेलची सुविधा नसल्याने चालकांची गैरसोय झाली.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने एसटी बसगाड्या पनवेलमार्गे कोकणाकडे जात असल्याने त्यांच्या पार्किंगसाठी कायमस्वरूपी जागा आणि चालकांच्या विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. बसगाड्या उभ्या करण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ आणि चालकांच्या विश्रांतीसाठी व्यवस्था असणे आवश्यक आहे.स्वच्छतागृहांची संख्या अपुरी असून सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने बसगाड्या येत असल्याने चालकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची मागणी होत आहे.
पनवेलमध्ये मोठे वाहनतळ नसल्याने एसटी महामंडळाने विमानतळाशेजारी रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने तेथे बस उभी कऱण्याचे नियोजन केले. चालकांची रात्रीची जेवण आणि पाण्याची सोय केली आहे. आता दुपारपासून बस निश्चित थांब्यावर सोडण्याचे काम सुरू आहे. – ज्ञानेश्वर म्हात्रे, व्यवस्थापक, पनवेल बस आगार
