नवी मुंबई : सण, उत्सवांच्या काळात कायदा-सुव्यवस्थेच्या आघाडीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील पोलीस तसेच महापालिका यंत्रणा संपूर्ण सजगता बाळगत असतानाच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा नक्की झाल्याने नवी मुंबई पोलीस तसेच महापालिका प्रशासन आतापासूनच या दुहेरी ताणाचे व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली आहे. येत्या १४ आणि १५ संप्टेबर रोजी वाशीतील सिडको प्रर्दशनी केंद्रात ‘हिंदी दिवस’ तसेच अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास शहा यांच्यासह देशभरातून पाच हजारांहून अधिक अधिकारी, सदस्यांची उपस्थिती अपेक्षीत धरण्यात आली आहे. याच काळात नवी मुंबईतील शासकीय यंत्रणांवर गणेशोत्सव तसेच दीड दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकांचा ताण असणार आहे. त्यामुळे यंत्रणांनी वाशी तसेच आसपासच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता आणि इतर नियोजनांची आखणीसाठी आतापासून विशेष व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारमार्फत १४ आणि १५ सप्टेंबर रोजी सहावे अखिल भारतीय राजभाषा संमेलनासाठी दोन दिवस वाशी येथील सिडको प्रर्दशनी केंद्र राखीव ठेवण्यात आले आहे. या दोन दिवसांपैकी एक दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वत: वाशीत असणार आहेत. शहा यांच्यासह केंद्र तसेच राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री, अधिकारी, सदस्यांचा मोठा लवाजमा याच काळात वाशी तसेच आसपासच्या परिसरात असणार आहे. १४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे. उत्सव काळात शासकीय यंत्रणांवर तसाही बंदोबस्त तसेच इतर नियोजनाचा भार मोठा असतो. याच कालावधीत केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा नक्की झाल्याने यंत्रणांवरील ताण मोठया प्रमाणावर वाढणार असून नवी मुंबई पोलीस आणि महापालिकेतील यासंबंधीचे नियोजन आतापासून हाती घेतले आहे.

व्यवस्थापनाचा भार कसा, कुठे असेल ?

१४ आणि १५ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत वाशी तसेच आसपासच्या परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणा तैनात करावी लागणार आहे. दोन्ही दिवशी प्रथमोपचार सुविधांसाठी विशेष वैद्यकिय कक्षाची उलब्धता तसेच दोन दिवस या भागात सुसज्ज अशा रुग्णवाहिकांचे नियोजन करण्याची आखणी करण्यात आली आहे. सिडको प्रर्दशनी केंद्र तसेच आसपासच्या भागात दहा हजारांहून अधिक वाहनांसाठी विशेष वाहनतळाची उपलब्धता केली जात असून त्यासाठीचे नियोजन हाती घेण्यात आले आहे.

वाशी येथील तुंगा हॉटेल समोरील वाहनतळाची जागा यासाठी ताब्यात घेण्याचे नियोजन मंगळवारी सायंकाळपासूनच सुरु करण्यात आले आहे. या संपूर्ण परिसरात विशेष पोलीस दल तसेच सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनासाठी पोलीस दलाकडून आढावा बैठका सुरु करण्यात आल्या आहेत, अशी माहिती नवी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकसत्ताला दिली. गणेशोत्सवातील बंदोबस्त, नियोजन तसेच दुसऱ्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकांचा भार याच काळात शहरातील शासकीय यंत्रणांवर असणार आहे. त्यामुळे राज्यातील इतर भागातून अतिरीक्त पोलीस दलाची मागणी करण्यात आली आहे, असेही सुत्रांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डाॅ.कैलाश शिंदे यांनी या काळातील नियोजनासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून गणेशोत्सवाच्या नियोजनावर या कार्यक्रमाचा परिणाम होऊ नये अशापद्धतीची आखणी केली जात आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.