नवी मुंबई: गस्ती पोलिसांना मुंबईत बॉम्ब ठेवला अशी तोकडी माहिती देऊन फोन ठेवणाऱ्या इसमाला पोलिसांनी शोधण्यात यश मिळवले आहे. त्याने सहज मस्करी म्हणून फोन केल्याची मान्य केले असून त्याच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तुफान नुरल शेख असे संशयित आरोपीचे नाव असून तो बिगारी काम करून गुजराण करतो.
अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्ध अद्याप पूर्ण थांबलेलं नसून चर्चा पुरते २० दिवस स्थगित केले गेले आहे. याच दरम्यान भारतात मोठा घातपात करण्याचा कट शिजत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मुंबई आणि मुंबई शेजारील मोठ्या शहरात पोलीस सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.या प्रकरणी ज्या उपायोजना करावयाच्या आहेत त्या गुप्तपणे सुरु करण्यात आल्या आहेत.
अशा गंभीर वातावरणात ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांनी एपीएमसी पोलिसांना एका मोबाईल क्रमांकावरून एक फोन आला. फोनवर बोलणार्या व्यक्तीने “कॉलर बोल्ट आहे आतंकवादी आहे ते मुंबई मध्ये बॉम्ब उडवणार आहे.” अशी तोकडी माहिती देत फोन कट केला. त्याचा हा फोन खोडसाळ पणा असल्याची पोलिसांना शंका आली . मात्र एकंदरीत देशातील परिस्थिती पाहता पोलिसांनी प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांनी फोन कुठून आला कोणी केला याचा शोध तात्काळ सुरु केला. असा फोन आल्याने पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी तात्काळ शोधकामी पथक नेमले. स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त पासून ते पोलीस शिपाई सर्वच जण या कामाला लागले. श्वान पथक हि पाचारण करण्यात आले.
तांत्रिक तपास वेगात सुरु केल्याने जेथून फोन आला ते लोकेशन शोधण्यात आला . त्या परिसरात शोध सुरु केला असता एक संशयित इसम आढळून आला. त्याचा पकडून पोलिसांनी चौकशी केली असता तुफान नुरल शेख असे त्याने स्वतःचे नाव सांगितले. तो कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मिळेल ते काम करून गुजराण करतो व रात्र जेथे जागा मिळेल तेथे घालवतो. ज्या मोबाईल क्रमांक वरून पोलिसांना फोन आला तो फोनही त्याच्या कडे आढळून आला. .त्याने मस्करी म्हणून फोन केल्याचे सांगितले. अशी माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्याला सात वर्षापेक्षा जास्त सजा नसल्याने त्याला नोटीस बजावून सोडून देण्यात आले आहे.
