नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) प्रशासनात शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. नव्याने पदभार स्वीकारलेले सचिव शरद जरे यांनी कारभार सांभाळताच बाजार समितीचे कामकाज अधिक पारदर्शक, तंत्रज्ञानाधारित आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या उद्देशाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
इतिहासात प्रथमच मुंबई एपीएमसीच्या सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. सोमवारी सकाळी झालेल्या या बैठकीत पाचही बाजाराचे उपसचिव, उपअभियंता आणि विभागप्रमुख व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. बैठकीत सचिव जरे यांनी बाजार समितीच्या उत्पन्नवाढ, विकासकामांची स्थिती, चालू प्रकल्प, तसेच न्यायालयीन प्रकरणांवरील पाठपुरावा यांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, बाजार परिसरातील वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि अनधिकृत बांधकामांवर आळा घालण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सीसीटीव्ही नियंत्रणावर प्रश्नचिन्ह
मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्थेसाठी स्वतंत्र अधिकारी नेमलेले असतानाही, सध्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष काही ठरावीक व्यक्तींसाठीच खुला असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही नियंत्रणकक्ष मुख्य सुरक्षा अधिकारी आणि सचिव यांच्या अखत्यारित आणावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून आणि बाजार घटकांकडून करण्यात आली होती. त्यावर जरे यांनी या व्यवस्थेचा पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहेत.
डिजिटायझेशनचा संकल्प
एपीएमसीच्या कामकाजाला तांत्रिक गती देण्यासाठी सचिव जरे यांनी डिजिटायझेशनचा संकल्प केला आहे. २५ वर्षांपूर्वीची जुनी ‘डीओएस’ सॉफ्टवेअर प्रणाली हटवून आधुनिक सॉफ्टवेअर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फळ मार्केटमध्येही कांदा, बटाटा आणि भाजीपाला मार्केटप्रमाणे सेस वसुली सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामुळे समितीच्या उत्पन्नात कोट्यवधी रुपयांची वाढ होईल आणि गेटवरील तक्रारी कमी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रत्येक मार्केटच्या उपसचिवांना आता स्वतंत्र अधिकार देण्यात आले असून, सचिव दररोज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या कामकाजाचा थेट आढावा घेणार आहेत. तसेच सर्व बाजार परिसरांना लवकरच सीसीटीव्ही नियंत्रणाखाली आणून स्वतंत्र ‘वॉर रूम’ स्थापन करण्याचे काम सुरू आहे. या माध्यमातून बाजार परिसरातील हालचालींवर २४ तास देखरेख ठेवली जाणार आहे. त्याशिवाय आवश्यकता भासल्यास बाजार समितीतील पाचही बाजार परिसरावर ड्रोनच्या साहाय्याने लक्ष ठेवण्याचाही विचार केला जाईल, असे जरे यांनी स्पष्ट केले आहे.
शिस्तीचा ‘कोड ऑफ कंडक्ट’
एपीएमसी मुख्यालयात शिस्तीची अंमलबजावणी करण्यासाठी सचिवांनी कडक नियम लागू केले आहेत. आता मुख्यालयात ये-जा एकाच प्रवेशद्वारातून होणार असून, प्रत्येक व्यक्तीची नोंद खास रजिस्टरमध्ये केली जाणार आहे. कोणत्या विभागात भेट दिली, किती वेळ थांबले, याची नोंद अनिवार्य करण्यात आली आहे. अनधिकृत वावरावर नियंत्रण ठेवून कार्यालयीन वेळेत फक्त कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती राहावी, असा स्पष्ट निर्देश जरे यांनी दिला आहे.
